आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरी, आयआयटी तंत्रज्ञान दिल्लीची हवा शुद्ध करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘राजधानी दिल्लीतील प्रदूषणाच्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) आणि आय.आय.टी. मुंबईने संयुक्तपणे विकसित केलेल्या विंड ऑगमेंटेशन अँड एअर प्युरिफाइंग युनिट (वायू) या हवा शुद्धीकरण यंत्रणेचा वापर होणार आहे. वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषित होणारी हवा शुद्ध करण्यासाठी खास हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले अाहे. दिल्लीतील पाच ठिकाणांवर ही यंत्रणा बसवली जाणार अाहे,’ अशी माहिती नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार यांनी दिली. 
वाढत्या प्रदूषणाच्या संकटावर मात करण्यासाठी ‘नीरी’च्या अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या या उपाययोजना दिल्ली राज्य सरकारने मान्य केल्या असून त्यात हवा शुद्धीकरण यंत्रणा बसवण्याच्या उपाययोजनेचा समावेश असल्याचे डॉ. राकेश कुमार यांनी सांगितले. 

पुण्यात या यंत्रणेचा वापर यशस्वी ठरला असून मुंबईतही वाहनांच्या वर्दळीच्या ठिकाणांवर ही यंत्रणा बसवण्याची घोषणा एप्रिल महिन्यात करण्यात आली आहे. दिल्लीत आनंद विहार, आयटीओ, सराय काले खा, कश्मिरी गेट आणि आयआयटी दिल्ली अथवा एम्स रुग्णालयाजवळ ही यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव असून, येत्या दीड महिन्यात काम पूर्ण केले जाणार असल्याचे दिल्ली सरकारने जाहीर केले आहे.  दिल्लीतील प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यात या यंत्रणेचा मोठाच हातभार लागेल, असा विश्वास डॉ. राकेश कुमार यांनी व्यक्त केला.

नव्या तंत्रज्ञानाचा फायदा
नीरी आणि आयआयटी मुंबईकडून विकसित करण्यात आलेल्या वायू यंत्रणेच्या माध्यमातून वाहतुकीमुळे वाहनांची कोंडी होणाऱ्या ठिकाणांवर २० मीटरच्या परिघातील हवा शुद्ध करणे शक्य होते.

या यंत्रणेच्या माध्यमातून शुद्ध हवेच्या उत्सर्जनासह हवेतील प्रदूषक घटक काढून टाकता येतात. त्यासाठी यंत्रणेमध्ये विंड जनरेटर्स आणि फिल्टर्ससह प्रदूषक घटक काढून टाकण्यासाठी थर्मल ऑक्सीडायझरचा वापर करण्यात आला.

फिल्टर्समधून प्रवाहित होणाऱ्या हवेतून धुळीचे कण काढून टाकले जातात. त्यानंतर थर्मल ऑक्सिडायझरच्या माध्यमातून कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बनचे परिवर्तन कार्बन डाय ऑक्साईडमध्ये होते. या यंत्रणेच्या माध्यमातून परिसरातील प्रदूषणाचे प्रमाण ४० ते ६० टक्क्यांनी कमी करण्यास मदत होते.

‘नीरी’ने विकसित केली ‘टीआयईसी’ यंत्रणाही
नीरीच्या नागपुरातील वैज्ञानिकांच्या चमूने याच धर्तीवर आणखी एक उपकरण विकसित केले आहे. ट्रॅफिक इंटर सेक्शन एमिशन कंट्रोल (टीआयईसी) यंत्रणेच्या माध्यमातून हवेतील पीएम-१०, पीएम-२.५, धूळ, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि हायड्रोकार्बन हे प्रदूषक घटक बाहेर काढून १० मीटर परिघातील हवेचे शुद्धीकरण केले जाते. प्रदूषित हवा शोषून घेतल्यावर ती शुद्ध करून बाहेर फेकली जाते. फिल्टरच्या माध्यमातून शुद्ध हवा बाहेर पडताना हवेच्या शुद्धतेचे मोजमापही होते, अशी माहिती नीरीच्या वायूप्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आणि वरिठ प्रधान वैज्ञानिक डॉ. पद्मा राव यांनी दिली. या यंत्रणेचा नागपुरातील वर्दळीच्या शंकरनगर चौक परिसरात यशस्वी वापर करण्यात आला आहे, हे येथे उल्लेखनीय.
बातम्या आणखी आहेत...