आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता थेट सीपींना द्या अवैध धंद्यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे पोलिस प्रशासनाची होत असलेली नाचक्की जनमाणसातील पोलिसांची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी आता पोलिस आयुक्तांनी पुढाकार घेतला असून, थेट जनतेकडून अवैध धंद्यांची माहिती घेण्यासाठी त्यांनी गुरुवारी (दि.२७)आपला स्वत:चा मोबाईल क्रमांक जाहीर केला आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे शहरातील ठाणेदारांचे धाबे दणाणले असून,ते आपापल्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे.
दसऱ्याच्या दिवशी खुद्द पालकमंत्र्यांनी शहरात सुरू असलेल्या वरली मटक्याच्या अड्यावर धाड टाकून काही आरोपींना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिस आयुक्तांनी आपल्याला अधिकाऱ्यांनी मिसगाईड केल्याचे सांगून यापुढे जनतेकडूनही माहिती घेणार,असे जाहीर केले होते. दरम्यान, गुरूवारी (दि. २७) पोलिस आयुक्तांनी ८००७३११००६ हा स्वत:चा मोबाईल क्रमांक जाहीर केला आहे. नागरिकांना अवैध व्यवसाय किंवा अन्य काही महत्वाची माहिती द्यायची असेल तर थेट फोन करावा, असे आवाहनही पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी केले आहे.

आयुक्तालयाच्या हद्दीतील ‘अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन’ हाच नारा सद्या तरी शहर पोलिसांचा आहे. त्यामुळेच मागील पाच दिवसांपासून रात्री शहरात पोलिसांचा ताफा कार्यरत आहे. मात्र तरीही छुप्या पद्धतीने कोठे अवैध व्यवसाय सुरू असेल तर या बाबतची माहिती नागरिक थेट पोलिस आयुक्तांना मोबाईलवरून देऊ शकतात. कारण अनेकदा पोलिसांना माहिती देण्यासाठी नागरिक नियंत्रण कक्ष किंवा १०० क्रमांकावर फोन करतात, मात्र सदर क्रमांक लागत नाही किंवा त्यावर माहिती दिल्यास एखादवेळी प्रतिसादसुद्धा मिळत नाही. मात्र,आता नागरिकांना आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध बेकायदेशीर व्यवसायाची माहिती थेट पोलिस आयुक्तांना देता येणार आहे.

गणेशोत्सवात राहिली शांतता
पोलिस महासंचालकांनी २६ ऑक्टोबरला राज्यातील सर्व पोलिस आयुक्त विशेष पोलिस महानिरीक्षकांची मुंबईत बैठक बोलावून आगामी काळात होऊ घातलेल्या पंचायत समिती , नगर परिषद , महापालिका, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. याचवेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या जिल्ह्यात किती गुन्हे दाखल झाले, याचा तपशील जाहीर झाल्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात अमरावती आयुक्तालयाच्या हद्दीत दखलपात्र किंवा अदखलपात्र एकही गुन्हा दाखल नाही. ही चांगली बाब असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...