आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Amravati University, Students Department Head Clash On Peak

अमरावती विद्यापीठातही विद्यार्थी-विभागप्रमुखांमधील संघर्ष शिगेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण देशभर गाजत असतानाच येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. एस. एन. बेहरा यांच्याकडून होणारे मानसिक खच्चीकरण असभ्य वर्तणुकी विरोधात विद्यार्थ्यांनी बंड पुकारले आहे. विभागप्रमुखांना तत्काळ निलंबित केल्यास प्रवेशच रद्द करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, विद्यापीठांतर्गत राजकारणासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात असल्याचा नवीन वादाचा विषय एनएसयूआयने उपस्थित करून पीडित विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी (दि.२२ ) विद्यापीठावर धडक दिली. विभागप्रमुख विद्यार्थ्यांच्या या संघर्षात विद्यापीठाची नाहक बदनामी होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. एस. एन. बेहरा यांच्या त्रासाला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल दोन आठवड्यांपासून विभागामध्ये पायदेखील ठेवला नाही. एम.पी.एड. प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम तयार नसल्याची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात संघर्ष सुरू झाला. अभ्यासक्रम तयार नसल्याने विभागप्रमुखाने विद्यापीठविरोधात तक्रार करण्याची सूचना केल्याची माहिती विद्यार्थ्यांकडून दिली जात आहे. मात्र, आता अभ्यासक्रम नाही तर विभागप्रमुखांकडून होणारे मानसिक खच्चीकरण असभ्य वर्तणुकीविरोधात आंदोलन केले जात असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.
विद्यार्थ्यांकडून पत्रकार परिषद घेण्यात आल्यानंतर डॉ. बेहरा यांनादेखील शो-कॉज देत प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मात्र, या प्रकरणात वेगळीच डाळ शिजत असल्याची कुणकुण विद्यापीठ परिसरात सुरू आहे. कुलसचिव नियुक्तीपासून विद्यापीठाचे अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. शिवाय शारीरिक शिक्षण विभागप्रमुखाचे पददेखील या राजकारणाचे केंद्रबिंदू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, देशात दलित- अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणण्याचे तसेच त्यांना आत्महत्या करण्याइतके मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रकार समोर येत आहे, अशा स्थितीत देशाच्या अत्यंत संदेशनशील असलेल्या प्रदेशातून विद्यापीठात शिक्षण घेण्यास आलेल्या विद्यार्थ्यांसोबत असा प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्याची मागणीदेखील एनएसयूआयकडून करण्यात आली.

या वेळी प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांना निवेदन देत चर्चा करण्यात आली. या वेळी प्रदेश अध्यक्ष अक्षय भूयार, जिल्हाध्यक्ष ऋषीराज मेटकर, शहर अध्यक्ष संकेत कुलट, रोहित देशमुख, केतन बारबुद्धे, शुभम बारबुद्धे, संकेत साहू, प्रणव लेंडे, प्रणव भुरंगे, संकेत बोके, शान खान, अमोल इंगळे, बबलू बोबडे, वैभव राऊत, नीलेश नांदणे, अनिकेत उताणे, अनिकेत भूयार, वैभव मोरे, अभिजित पडोळे, मुसेक शेख, मो. अझर शेख, दानेश खान आदी उपस्थित होते.

कुलूपबंद विद्यापीठ : एनएसयूआयच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी धडक दिल्यानंतर विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयाला लगेच कुलूपबंद करण्यात आले. संदेशनशील असलेल्या विषयावर प्रशासनासोबत चर्चेसाठी प्रवेश दिल्या जात नसल्याने प्रवेशद्वाराजवळ एनएसयूआयचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. सुरक्षा रक्षकांसोबत रेटा-रेटी करीत आत शिरण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला.

प्रवेश रद्दवर विद्यार्थी ठाम : विभागप्रमुखबदलण्यास विद्यापीठाने नकार दिल्यास प्रवेश रद्द करण्याचा इशारा विद्यार्थ्यांकडून देण्यात आला अाहे. महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांनी एमएपीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेतले आहे. त्यांच्याकडून प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यास नुकतेच ‘अ’ श्रेणी प्राप्त झालेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची मोठी बदनामी होण्याची शक्यता आहे.

पोलिसांत तक्रार : विद्यार्थ्यांसोबतअपमानजनक वर्तन केल्याने याबाबत एनएसयूआयकडून पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. विद्यार्थ्यांचा मानसिक, आर्थिक छळ तसेच अवैधपणे बांधकाम साहित्य सांगणे आदी बाबी त्यामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. पोलिस कारवाईकडे शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

पुढे काय? : द्यावे लागेल उत्तर : शारीरिकशिक्षण विभागात प्रवेशित विद्यार्थी हे परप्रांतातील आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यास तेथील राज्य शासनाला अमरावती विद्यापीठाला उत्तर द्यावे लागेल.

सत्यता बाहेर काढा
शारीरिक शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांनी आधी विद्यापीठाविरोधात भूमिका घेतली होती. आता विभागप्रमुखावर गंभीर आक्षेप घेतले आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार प्रशासनाने तत्काळ कारवाई करून सत्यता बाहेर काढावी. विभागप्रमुखांना तत्काळ निलंबित केल्यास पोलिसांत तक्रार दाखल करू. अक्षय भुयार, प्रदेशअध्यक्ष, एनएसयूआय.

कायदेशीर कारवाई केली जाईल
शारीरिक शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांकडून विभागप्रमुखाविरोधात दिलेली तक्रार विद्यापीठास प्राप्त झाली आहे. त्यानुसार विद्यापीठाने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांचे उत्तर प्राप्त झाल्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. डॉ. जयकिरण तिडके, प्र-कुलगुरू,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती.