आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद सोमवार : मुलांना बालपणामध्येच मिळताहेत सामाजिक कार्याचे धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मुलांचे गट एकत्र येतात.. निरीक्षण शक्तीनुसार समस्या शोधून त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न करतात... त्यांच्यापैकी कुणी गावातील तलाव साफ केला.. कुणी शिक्षक नसलेली शाळा चालवली.. काहींनी प्लास्टिकविरोधी जागृतीचे प्रयत्न केले..असे उपक्रम मुलांना स्वेच्छेने हाती घ्यायला लावून त्यांच्यात सामाजिक भान निर्माण करण्याचे व त्यानिमित्ताने उद्याचे सामाजिक कार्यकर्ते घडवण्याचा सर्च संस्थेचा कुमार निर्माण प्रकल्प चर्चेचा विषय ठरतो आहे.. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग व विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून तीन वर्षांपूर्वी सुरू झालेला शैक्षणिक उपक्रम. या उपक्रमात अभ्यासक्रमाची घोकंपट्टी नाही की परीक्षा नाहीत. मुलांनी सकारात्मक उपक्रम हाती घेऊन तो पूर्ण करायचा. ते एकट्याने नव्हे, तर एकमेकांचे सहकार्य घेऊन गटानेच तो करायचा. उपक्रम हाती घेताना त्यातून मुलांना आनंद हा मिळायलाच हवा. त्यामुळे मुले समरस होऊन तो पूर्ण करतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेला पुण्याचा प्रफुल्ल शशिकांत या कुमार निर्माण प्रकल्पाचा प्रमुख म्हणून काम करतोय. चार वर्षांपूर्वी ‘सर्च’च्या निर्माण शिबिराच्या निमित्ताने या कार्याशी जुळलेल्या प्रफुल्लने कुमार निर्माणाच्या कार्यातच स्वत:ला झोकून दिलेय. त्याला औरंगाबादचा शैलेश जाधव, प्रणाली सिसोदिया, असे दोन सहकारीही मिळाले आहेत.

गट संख्या वाढवणार
राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये ४९ गटातून कुमार निर्माण प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रत्येक गटात १० ते १५ मुलांचा समावेश आहे. पाचवी ते दहावी दरम्यानच्या मुलांचा समावेश असलेल्या या गटांनी मोठ्यांनाही लाजवेल, असे उपक्रम हाती घेतल्याचे प्रफुल्लने सांगितले. या प्रकल्पातून मिळणारे निकाल उत्साहवर्धक आहेत. त्यामुळे गटांची संख्या १०० पर्यंत वाढवण्याचे प्रयत्न राहतील, असेही प्रफुल्ल म्हणाला.