आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन माफियांच्या इशाऱ्यावर चालतो गुटखा तस्करीचा खेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - राज्यात गुटखा बंदी झाली असतानाही जिल्ह्यातील प्रत्येक पानटपरीवर गुटखा आणि सुगंधी तंबाखूची खुलेआम विक्री करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी करण्यात येत असून, कारंजा येथील फिरोज आणि अमरावती येथील जावेद या दोघांच्या इशाऱ्यावर गुटखा तस्करीचा हा संपूर्ण खेळ चालवण्यात येत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या संदर्भात संबंधित सर्व विभागांना माहिती असतानाही कारवाई करण्यासाठी कुणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही. 
 
काही दिवसांपूर्वी शहरातील टांगा चौक परिसरातील एका सुगंध सेंटरवर पोलिसांनी कारवाई करून सव्वा लाख रुपये किमतीचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केला. यापूर्वीही यवतमाळ, आर्णी, वणी, पांढरकवडा या ठिकाणी करण्यात आलेल्या अनेक कारवायांमध्ये लाखो रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. असे असले तरी आजही बंदी असलेल्या या सर्व वस्तू सहज उपलब्ध होत आहेत. त्याचे कारण आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेली गुटख्याची तस्करी. जिल्ह्यात येणारा गुटखा सध्या वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथून येतो. ही तस्करी करणाऱ्यांमध्ये कारंजा येथील फिरोज, तर अमरावती येथील जावेद नामक व्यक्तींचा महत्वाचा वाटा असून ते दोघे या गुटखा तस्करीचे मुख्य सूत्रधार आहेत. 

राज्यात गुटखा बंदी असल्याने शेजारच्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात गुटखा कारंजा येथे बोलावण्यात येतो. त्या ठिकाणी आलेला गुटखा साठवून ठेवता त्याच दिवशी तो अन्य ठिकाणी रवाना करण्यात येतो. त्या ठिकाणांमध्ये यवतमाळ जिल्ह्याचाही समावेश आहे. यवतमाळ येथे आलेला गुटखा हा जिल्ह्यातील तालुके आणि गावातील सु्गंध सेंटर धारकांकडे रवाना करण्यात येतो. त्यांच्याकडून हा माल पानटपरी चालकांपर्यंत आणि त्यांच्यामार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येतो. या चेनची माहिती असतानाही त्यावर कारवाई करायचे अधिकार असलेल्या विभागांपैकी एकाही विभागाकडून ठोस कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. जादादराने गुटखा विक्री: कारंजातूनशहरात गुटखा आल्यानंतर या गुटखा पुड्यांची विक्रेते अव्वाच्या सव्वा दराने विक्री करून ग्राहकांची लूट करत आहेत. एक रुपयाला मिळणारी पुडी पाच रुपयांना तर पाच रुपयांमध्ये मिळणारी गुटखा पुडी १० ते १५ रुपयांना विक्री करण्यात येते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधित विभागाने ठोस कारवाई करून गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. 

लाखो रुपयांच्या गुटख्याची तस्करी 
यवतमाळ जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या या गुटख्याच्या तस्करीमधून दररोज साधारणत: १० लाख रुपयांची उलाढाल होते. अशाच प्रकारे अन्य ठिकाणी हा माल पुरवण्यात येतो. त्यामुळे महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांच्या गुटख्याची तस्करी यवतमाळ जिल्ह्यात होते. त्या मानाने होणारी कारवाई अत्यल्प प्रमाणात आहे. 

कारंजातील गोदामातून विल्हेवाट 
कारंजा येथे गुटखा तस्करी करणाऱ्यांनी मोठे गोदाम तयार केले असल्याची माहिती आहे. या गोदामात आंध्र प्रदेशातून येणारी वाहने रात्री वाजताच्या सुमारास रिकामी करण्यात येतात. त्यानंतर छोट्या वाहनांमध्ये भरून रातोरात त्या मालाची विल्हेवाट लावण्यात येते. त्यासाठी कारंजात असलेल्या या गोदामांचा वापर करण्यात येतो. 

रात्रीच्या काळोखात चालते वाहतूक 
कारंजा येथून रात्रीच्या वेळी यवतमाळ शहरात गुटखा पोहोचवण्यात येतो. गुटखा पोहोचवण्यासाठी बोलेरो पीक अप सारख्या वाहनांचा वापर करण्यात येत असून, रात्री साधारणत: ३.३० वाजताच्या सुमारास ही वाहने शहरात येतात. कारंजातून येणारी गुटख्याची ही वाहने कधी दारव्हा मार्गे तर कधी नेर मार्गे यवतमाळ शहर गाठतात. 

आंध्र प्रदेशातून येतो कारंजामध्ये गुटखा 
कारंजा हे या गुटखा तस्करीचे मुख्य केंद्र बनले आहे. कारंजा येथे वाहनातून येणारा गुटखा आंध्र प्रदेश या राज्यातून येतो. आंध्र प्रदेशातून गुटखा घेऊन निघालेली ही वाहने करीम नगर, नांदेड या मार्गे कारंजा येथे येतात. त्या ठिकाणी असलेल्या गोदामात गुटखा उतरवण्यात येतो. 
बातम्या आणखी आहेत...