आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Investigation Of Unfair Treatment To Gymnastic Players In Final Stage

जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत खेळाडूंवर अन्याय करणाऱ्या पंचांची चौकशी अंतिम टप्प्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती येथील राज्य जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत खेळाडूंवर अन्याय करणाऱ्या पंचांची चौकशी अंतिम टप्प्यात असून, क्रीडा युवक सेवा संचालनालयाचे क्रीडा आयुक्त राजाराम माने यांच्या हाती चार दिवसांत अहवाल येणार आहे. खेळाडूंबद्दल भेदभाव करत गुणांमध्ये फेरफार करणाऱ्यांची गय करणार नाही. आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांच्या हाती गुळमुळीत अहवाल सोपवून प्रकरण दडपले जाण्याची शक्यता अन्याय झालेल्या जिम्नॅस्टच्या पालकांना त्रस्त करीत आहे.

अमरावती येथे नोव्हेंबर २०१५ च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ठाणे येथील स्पर्धा संचालकांच्या निर्देशांवरून इतर सहकारी पंचांनी राष्ट्रीय खेळाडूला मारहाण केली. तसेच स्वत:च्या क्लबमधील जिम्नॅस्टला क्षमता नसतानाही मनमानी कारभार करीत जास्तीत जास्त गुण दिले, तर इतर खेळाडूंवर मात्र लहानशा तांत्रिक चुकांसाठीही कमी गुण देऊन त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. वास्तविकत: कोणत्याही तांत्रिक चुकीचे गुण कापले जात नाही. या प्रकरणाची गंभीर दखल घेत दैनिक दिव्य मराठीने नोव्हेंबर रोजी जिम्नॅस्टवर अन्याय दोनदा राष्ट्रीय खेळाडू राहिलेल्या अनास अली शेखला पंचाकडून मारहाणीचे वृत्त प्रकाशित केले. त्याचे राज्यभरात चांगलेच पडसाद उमटले. ‘दिव्य मराठी’च्या वृत्तामुळे मुकाटपणे अन्याय सहन करणाऱ्या पालकांनाही प्रेरणा मिळाली. मग, या अन्यायप्रकरणी क्रीडा युवक सेवा संचालनालयाकडे सातत्याने स्पर्धा संचालकांविरुद्ध तक्रारी यायला लागल्या. अखेर नाइलाजास्तव तक्रारींचा चढता क्रम बघून स्पर्धेचे मुख्य पंच महेंद्र बाभुळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध क्रीडा आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले. याप्रकरणी क्रीडा संचालक नरेंद्र सोपल यांच्या नेतृत्वातील आयोगाची चौकशी सुरू असून, येत्या चार दिवसांत अहवाल हाती येईल. त्यानंतर दोषी पंचांवर कठोर कारवाई केली जाईल, असे क्रीडा आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
अमरावती येथील स्पर्धेत पंचांच्या क्लबचे जे जिम्नॅस्ट नव्हते केवळ त्यांच्यावर अन्याय झाल्याचे इतर तटस्थ पंचांना माहिती आहे, तरीही ते गप्प आहेत. नाव छापण्याच्या अटीवर काही पंचांनी तशी माहितीही दिली आहे. मात्र, बालेवाडीत वेगळाच कट शिजत आहे. जर याप्रकरणी पंच दोषी ठरले, तर स्पर्धा संचालक महेंद्र बाभुळकर यांच्यासह इतर सहायक पंचांवर कारवाई करावी लागेल अन् या खेळाला पोखरण्यात आजवर ज्यांचा-ज्यांचा हात होता, त्या सर्वांचे बिंग फुटेल म्हणून हे प्रकरण नियमित करण्याची जोरदार धडपड बालेवाडीत सुरू आहे. आयुक्त राजाराम माने यांच्यापुढे सुनावणीसाठी अहवाल ठेवण्यापूर्वी त्यात मनाप्रमाणे बदल करून घेत बाभुळकर यांना वाचवण्याचा जोरदार प्रयत्न अधिकाऱ्यांनी सुरू केल्याच्याही तक्रारी पालकांच्या आहेत.
चौकशी समितीवर पालकांनी व्यक्त केला अविश्वास
ज्यांच्याविरुद्धतक्रार आहे त्यांच्याच हाती चौकशीची जबाबदारी दिल्यामुळे पालकांचा चौकशी समितीवर विश्वास नाही. क्रीडा युवक सेवा संचालनालयातील अधिकाऱ्यांनी पडद्यामागे प्रकरण दडपण्यासाठी जो ‘माये’चा खेळ खेळला त्याला जागताना आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स पंच प्रवीण ढगे, संजोग ढोले, योगेश शिर्के आणि पवन भोईर यांची चौकशी समिती नेमण्यात आली. ते स्पर्धेदरम्यान उपस्थित होते. समिती क्रीडा संचालक नरेंद्र सोपलांच्या नेतृत्वात काम करीत आहे. त्यामुळे पालकांनी या समितीवरही नाराजी व्यक्त केली आहे.

दोषींवर कारवाई
अमरावती येथील राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत खेळाडूंवर झालेल्या अन्यायाची चौकशी पालकांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे क्रीडा संचालक नरेंद्र सोपल यांच्या नेतृत्वात सुरू आहे. येत्या चार दिवसांत चौकशी अहवाल हाती येईल. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. राजाराममाने, क्रीडा आयुक्त, क्रीडा युवक सेवा संचालनालय, पुणे.