आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायवेवर लैला-मजनूंचा धुमाकूळ, एकतर्फी प्रेमातून दोन विद्यार्थिनींचा विनयभंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदगाव पेठ- महाविद्यालय शिकवणीच्या नावावर घरातून बाहेर पडलेल्या तरुणांच्या जोडप्यांनी सध्या नागपूर, मोर्शी महामार्गावर धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. या जोडप्यांनी भर रस्त्यावर दुचाकीवर अश्लील चाळे करत भरधाव दुचाक्या चालवत आहेत. तोंडाला दुपट्टा बांधून असल्याने सुसाट वेगाने जाणारी ही मुले नेमकी कुणाची याचाही थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे जोडप्यांना कुणाचाच धरबंद नसल्यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नागपूर-मोर्शी महामार्गावर सध्या शाळा महाविद्यालयाच्या गणवेशात असलेल्या तरूण जोडप्यांची मोठी वर्दळ वाढली आहे. तोंडाला दुपट्टे बांधून सदर जोडपे भरधाव या मार्गाने जात असून गावाबाहेर भर रस्त्यांवर त्यांनी अश्लील चाळे सुरू केल्याचे चित्र सर्रास दिसून येत आहे. शिक्षणाच्या नावावर आणि कॉलेजच्या ड्रेसवर मुली- मुले जोडीने मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. चालत्या वाहनावर त्यांचे अश्लील हातवारे असभ्य वर्तन हे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशाकरिता मनस्ताप झाले आहे. याबाबत रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. सदर विद्यार्थी त्यांच्या गणवेशावरून प्रतिष्ठित विद्यालये महाविद्यालयातील असल्याचे दिसत असल्याने शाळा कॉलेजची प्रतिमा मलिन होत आहे. तरुणांच्या या वाढत्या प्रकारामुळे कोणतीही अनुचित घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हे विद्यार्थी वेळेवर घरून बाहेर पडतात आणि काॅलेज संपण्याच्या वेळेवर घरी पोहचतात त्यामुळे पालकांना शंका निर्माण होण्यासही जागा दिसून येत नाही. पोलिस प्रशासनाने याविषयी विशेष मोहीम राबवून लैला मजनूंना त्यांच्या आई वडिलांच्या समक्ष दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी जागरूक पालक वर्ग करीत आहे .

मुलांची करा चौकशी
शिक्षणाच्या नावावर विद्यार्थी घरून बाहेर पडतात मात्र बाहेरचे जग हे त्यांना माहीत नसल्याने अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजविघातक कार्य करू नये याबाबत पालकांनी दक्ष राहून अधून मधून शाळा, महाविद्यालय शिकवणी वर्गात आपल्या पाल्यांची चौकशी करीत राहणे गरजेचे झाले आहे.
एकतर्फी प्रेमातून दोन विद्यार्थिनींचा विनयभंग
एकतर्फीप्रेमातून दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना अचलपूर तळेगाव पोलिस ठाण्याअंतर्गंत घडली.

अचलपूर पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या घटनेत सतरा वर्षीय विद्यार्थिनी शाळा संपल्यानंतर घरी जाण्यासाठी मैत्रिणीची वाट पाहत उभी होती. सदर विद्यार्थिनी दररोज घरी जात असताना सतरा वर्षीय आरोपी दररोज तिचा पाठलाग करत होता. दरम्यान, शुक्रवारी विद्यार्थिनी मैत्रिणीसोबत उभी असताना आरोपी या विद्यार्थिनीजवळ आला. स्वत:चे नाव सांगून आरोपी अल्पवयीन विद्यार्थ्याने तू मला आवडते. मी तुझ्यावर प्रेम करत असून मला तुझा मोबाइल क्रमांक दे असे म्हणून तो तिच्याकडे बघू लागला. दरम्यान पीडित विद्यार्थिनीने शुक्रवारी रात्री साडे सात वाजताच्या सुमारास अचलपूर पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार दाखल केली. दुसरी घटना तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

शुक्रवारी सतरा वर्षीय विद्यार्थिनी महाविद्यालयात जात असताना २२ वर्षीय आरोपीने तिचा दुचाकीने पाठलाग केला. विद्यार्थिनीला थांबवून तू माझ्याशी का बोलत नाहीस असे म्हणून तू बोलली नाहीस तर मी तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध शुक्रवारी तळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...