आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण हटाव मोहिमेला चौथ्या दिवशी वेग; बांधकामांवर हातोडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला चौथ्या दिवशी वेग आला. उपायुक्त अजय चारठाणकर यांनी स्वत: उपस्थित राहून अतिक्रमणे हटवली. स्टेशन रोड परिसरात काही अतिक्रमणधारकांनी कारवाईस जोरदार विरोध केला. परंतु त्यांच्या विरोधाला जुमानता चारठाणकर यांनी कारवाई केली. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग आल्याचे चित्र गुरुवारी पहायला मिळाले.

महापालिकेने गेल्या चार दिवसांपासून शहराच्या विविध भागात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली ही मोहीम तीन दिवस थंड होती. किरकोळ अतिक्रमणे हटवण्यात आली. चौथ्या दिवशी मात्र उपायुक्त चारठाणकर यांनी स्वत: रस्त्यावर उतरून कारवाईस वेग दिला. स्टेशन रोड परिसरात काही पक्की अतिक्रमणेदेखील काढण्यात आली. या ठिकाणी कारवाईला विरोध झाला, परंतु चारठाणकर यांनी विरोधाला जुमानता कारवाई पूर्ण केली. गुरुवारी सकाळीच कारवाई सुरू झाली. दुपारनंतर मात्र दहीहंडीमुळे मोहीम बंद ठेवण्यात आली. टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबवण्यात येत आहे.

आतापर्यंत दीडशे ते दोनशे अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. अनेक टपऱ्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातही लवकरच ही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी आतापासूनच सावध पवित्रा घेतला आहे. काही ठिकाणी मात्र हटवण्यात आलेल्या टपऱ्या हातगाड्या पुन्हा पूर्वपदावर आल्या आहेत. विशेष म्हणजे मोठ्या अतिक्रमणांना या मोहिमेंतर्गत हात लावण्यात आलेला नाही. त्यामुळे गोरगरीब फेरीवाल्यांकडून महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...