आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिक्रमण हटणार, पार्किंगला जागा मिळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील भरबाजारात पार्किंगच्या जागांवर विविध व्यावसायिकांनी हातपाय पसरल्याने व्यापारी संकुलातील पार्किंगच्या जागाच गिळल्याने वाहने उभी करण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या समस्येची गृह खात्यानेही गंभीर दखल घेतली असून, पार्किंगच्या दुखण्यावर इलाज शोधण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिका तसेच पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पार्किंगची समस्या सोडवण्याबाबत बुधवारी (६ जुलै) निर्देश दिले.

शहरातील रस्त्यावर कोठेही वाहने लावली जात असल्याने ‘पार्किंगचा पोरखेळ’ शहरात सुरू असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले होते. पार्किंगची शिस्त हरवत चालल्याने वृत्त प्रकाशित करण्यात आल्यानंतर गृहखात्याने याची दखल घेतली. गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सकाळी महापालिका पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढणे तसेच पार्किंगच्या जागा मोकळ्या करण्याबाबत दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून काही प्रमुख मार्गांवरील मार्गदेखील निश्चित केले जाणार आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या अमरावती शहराला पार्किंगची कोणतीच शिस्त नसल्याचे वास्तव यावरून उघड होत आहे. रस्त्यावरून वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी सद्य:स्थितीत पार्किंगची जागा अपुरी पडत आहे. शहरातील प्रमुख रस्ते मोकळे करण्यास अद्याप प्रशासनाला यश आलेले नाही, त्यामुळे राजकमल चौक ते इतरत्र जाणाऱ्या मार्गांवर सतत वाहनांची गर्दी राहते. शिवाय जागोजागी वाहने उभी राहत असल्याने नागरिकांच्या समस्येत आणखीच भर पडते. सातत्याने गंभीर होत असलेल्या या समस्येतून मार्ग काढण्यास महापालिका प्रशासन सातत्याने अपयशी ठरल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. मध्यवस्तीत महापालिकेच्या स्वत:च्या व्यापारी संकुलात देखील पार्किंगच्या नियमांची सर्रास पायमल्ली करण्यात आल्याचे िदसून येते. व्यापारी संकुलांमध्ये पार्किंग सोडण्यात आल्या नाहीत, तर सोडण्यात आलेल्या जागांवर अतिक्रमण करण्यात आले. पार्किंग समस्येचे वास्तव समोर असतानादेखील महापालिका प्रशासनाकडून तत्कालीन अधिकाऱ्यांवर ठपका ठेवत कारवाई करण्यात आली नाही. नियमबाह्य बांधकाम परवानगी देणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांना अभय देण्याचे काम मनपाकडून होत असल्याने पार्किंगची समस्या गंभीर झाल्याची चर्चा आहे.

पुन्हाहातगाड्याच ‘टार्गेट’ : महापालिकेचीअतिक्रमण मोहीम म्हटली की आतापर्यंत हातावर घेऊन पोट भरणाऱ्या विक्रेत्यांच्या हातगाड्या उचलणे, किरकोळ विक्रेत्यांचे साहित्य भरून नेणे येथपर्यंतच मर्यादित राहिली आहे. परंतु, व्यावसायिकांनी गिळलेल्या पार्किंगच्या जागा, फुटपाथवर व्यावसायिकांनी पसरलेले हातपायांवर प्रशासनाने कायमस्वरूपी कधीच कारवाई केली नाही. भरबाजारात बड्या व्यावसायिकांनी दुकानासमोर ठेवलेले साहित्य, वाढवलेले बांधकाम यामुळे पार्किंगसाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. परंतु, या अतिक्रमणावर मात्र आतापर्यंत महापालिकेचा जेसीबी कधी चालल्याचे दिसून आले नाही. पानावर घेऊन हातावर खाणाऱ्या किरकोळ व्यावसायिकांना हक्काची जागा देता त्यांच्या गाड्या सातत्याने मनपाच्या ट्रकमध्ये टाकल्या जातात. परंतु, बड्या व्यावसायिकांनी गिळलेल्या पार्किंगच्या जागांचे काय, असा संतप्त सवाल सामान्य विक्रेत्यांकडून केल्या जात होता. स्थानिक विश्रामगृहातील बैठकीला अामदार डॉ. सुनील देशमुख, सीपी दत्तात्रय मंडलिक, मनपा आयुक्त हेमंत पवार, मनपा अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, पोलिस उपायुक्त मोरेश्वर आत्राम, शहर वाहतुक शाखेचे एसीपी पंजाबराव डोंगरदिवे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

पुढे काय?
वाहतूक मार्गांची निश्चिती : शहरातील पार्किंग समस्या निकाली काढण्यासाठी महापालिका तसेच पोलिस प्रशासनाकडून कारवाई सुरू झाली आहे. रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढले जात अाहे. मार्गावरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी वाहतूक मार्गदेखील निश्चित केले जाणार आहे.

कारवाई सुरू केली आहे
शहरातील वाहतूकव्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून एप्रिलमध्ये अधिसूचना काढून त्यानुसार कारवाई सुरू केली आहे. गृहराज्यमंत्री, पालकमंत्री, आमदारांकडून शहराच्या सुरळीत वाहतुकीबाबत पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार सुधारणा करण्याबाबत कारवाई केली जात आहे. दत्तात्रयमंडलिक, पोलिस आयुक्त

नियमानुसार कारवाई
वाहतुकीस अडथळाठरणारे रस्त्यांवरील अतिक्रमण नियमानुसार काढण्यात आले आहे. रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई ही अंतिम नाही, यापुढे रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढले जाईल. पार्किंग सुविधेबाबत कारवाई केली जाईल. हेमंतपवार, आयुक्त, महापालिका.

रस्त्यावरील हातगाड्या उचलण्याची मोहीम सुरू
रस्त्यावरीलहातगाड्या उचलण्याची मोहीम प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून, रस्त्यांवरील दुकानदारांनी-फेरीवाल्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (६ जुलै) करण्यात आली. या कारवाई दरम्यान तब्बल सहा ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.

इर्विन चौक ते रेल्वे स्टेशन, मालटेकडी ते गर्ल्स हायस्कूल चौक, पंचवटी ते नवसारी, राजापेठ ते नवाथे तसेच वेलकम पाइंट, बस डेपो या दरम्यानच्या रस्ते फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यात आले.वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याची कारवाई आगामी काळात देखील सुरू राहणार आहे. रस्त्यावर-फुटपाथवर अतिक्रमण करू नये, असे आवाहन पोलिस आयुक्तांकडून करण्यात आले. या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात हातगाड्या, पानटपऱ्यांसह तब्बल सहा ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई महापालिका, शहर वाहतूक शाखा पोलिस विभागाकडून संयुक्तपणे करण्यात आली. पोलिस उपायुक्त मोरेश्वर आत्राम, शहर वाहतूक शाखेचे एसीपी पंजाबराव डोंगरदिवे, गाडगेनगर वाहतूक शाखेचे पीआय डी.टी. नागे, राजापेठ शहर वाहतूक शाखेचे पीआय के. एम. पंुडकर, फ्रेजरपुरा शहर वाहतूक शाखेचे अजयकुमार मालवीय यांच्यासह स्थानिक पोलिस, महापालिकेच्या अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे, निरीक्षक उमेश सवाई आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...