आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधीक्षकांवर कारवाईचे स्पष्ट संकेत, बच्चू कडू यांच्या लक्षवेधी सूचनेवर सरकारचे उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती/ मुंबई- अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या भावाला तर तिवसाचे आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीची गंभीर दखल घेऊन येत्या सात दिवसांत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांच्यावर कारवाई करण्याचे अप्रत्यक्ष संकेत विधानसभेत दिले. तसेच या प्रकरणांमध्ये काही कनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या प्रकरणांची सखोल चौकशी करुन त्यात अगदी वरिष्ठ अधिकारी दोषी आढळला तरीही कारवाई केली जाईल असेही केसरकर म्हणाले.

जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पोलिस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी लक्षवेधी सूचनेदरम्यान विधानसभेत केला. जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे संरक्षण असल्याचेही ते म्हणाले.या अधिकाऱ्यांना पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांचे संरक्षण असून, त्यांच्याच निलंबनाची त्यांनी मागणी केली.
काहीही संबंध नसताना निव्वळ आपला भाऊ म्हणून एका प्रकरणात आपल्या भावालाच कशा पद्धतीने पोलिसांनी मारहाण केली त्याचे कडू यांनी वर्णन केले. याच लक्षवेधी दरम्यान अॅड. यशोमती ठाकूर यांनीही आपल्याला देखील एका आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीची तक्रार करत पोलिस अधीक्षकांवर कारवाईची मागणी केली. तर अधीक्षकांचे चुकीचे आदेश पाळणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आपण निलंबन करता मात्र ज्याच्या आदेशावरून मारहाण झाली त्या अधीक्षकांवर काय कारवाई करणार असा प्रश्न आमदार डाॅ. सुनील देशमुख यांनी उपस्थित केला. त्यावर या सर्व लोकप्रतिनिधींंच्या सुरात सूर मिसळत विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनीही लखमी गौतम हे पूर्वी आपल्या अहमदनगर जिल्ह्यात हाेते असे सांगत तिथेही त्यांच्याविरोधात तक्रारी असल्याचे सांगत लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या नातेवाइकांना मारहाण करणाऱ्या अशा मिजासखोर अधिकाऱ्याला निलंबित करावे,अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन या सर्व तक्रारींची चौकशी करून सात दिवसांच्या आत योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले. तसेच बच्चू कडू यांच्या भावाला मारहाण झाली त्या प्रकरणाची छाननी करून संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित केल्याचेही ते म्हणाले. तसेच त्यांच्या शरीरावरील जखमा या पोलिसी मारामुळे झाल्यात का याचीही चौकशी सुरू असून, तपासणी अंती योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
बातम्या आणखी आहेत...