आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजापेठ चौकात अवजड वाहनांना आता ‘नो एन्ट्री’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मागील महिनाभरापासून राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवरील पुलाचे काम सुरू झाले आहे. या कामामुळे राजापेठ चौकातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यातच आठ दिवसांपूर्वी राजापेठचे नवीन एसटी बसस्थानक कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे राजापेठ चौकात निर्माण झालेली वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी राजापेठ चौकातून जड वाहतूक बंद करून बसेससुद्धा अन्य मार्गाने वळवण्याचा निर्णय पोलिस उपायुक्त (वाहतूक) नितीन पवार यांनी सोमवारी (दि. २५) घेतला होता. दरम्यान, मंगळवारी त्यांनी एसटी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून राजापेठ चौकातून अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीबाबत ‘नोटिफिकेशन' काढण्याचा निर्णय घेतला आहे.
राजापेठ चौक हा शहरातील मुख्य चौकांपैकी एक आहे. या ठिकाणी मागील महिनाभरापासून रेल्वे पुलाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे अमरावतीवरून बडनेराकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. या कामामुळे राजापेठ चौकात वाहनांची सातत्याने गोची होत आहे. यातच एसटी किंवा अन्य कोणतेही जड वाहन आले तर या गोचीमध्ये अधिकच भर पडते. सद्य:स्थितीत राजापेठ चौक हा शहरातील सर्वाधिक कोंडी असलेला वाहतुकीचा चौक बनला आहे. काम सुरू असल्यामुळे वाहतूक प्रभावित होणे स्वाभाविकच आहे. मात्र, यावर उपाययोजना म्हणून या चौकातून जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिस विभागाने दोन दिवसांपूर्वीच घेतला होता. याच वेळी मात्र शहर बसेसला राजापेठ चौकातून प्रवेश दिला जाणार आहे. राजापेठ या ठिकाणी तयार असलेल्या बसस्थानकाचे आठ दिवसांपूर्वीच उद््घाटन झाले आहे. त्यामुळे याबससथानकावरून बसेसचे अावागमन सुरू झाले आहे. बसेसमुळे पूर्वीच विस्कळीत असलेली वाहतूक व्यवस्था अजूनच विस्कळीत होते. दिवसेंदिवस पुलाचे काम झपाट्याने अधिकाधिक अडचणींचे होत आहे. अशावेळी वेळीच उपाययोजना केल्यास भविष्यात एखादी अप्रिय घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण राजापेठ चौकाकडून राजकमलकडे येण्यासाठी किंवा जाण्यासाठी ३०० ते ४०० मीटर अंतर अवघी १० ते १२ फूट जागेचा रस्ता शिल्लक आहे. या मार्गावरून एसटी बस किंवा अन्य मोठे वाहन जात असताना इतर वाहन जाऊ शकत नाही. अशावेळी चौकातून जड वाहनांना प्रवेश देणेच योग्य ठरू शकते, असा निर्णय पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून घेतला होता. त्यामुळेच मंगळवारी पोलिस उपायुक्त नितीन पवार, वाहतूक शाखेचे प्रभारी एसीपी बळीराम डाखोरे, अमरावतीचे आगार व्यवस्थापक मनोहर धजेकर, बसस्थानकप्रमुख अभय बिहुरे तसेच महापालिकेचे शहर अभियंता जीवन सदार या अधिकाऱ्यांसह राजापेठ चौकातील वाहतुकीची पाहणी करण्यात आली तसेच संबंधित जड वाहतूक कोणत्या मार्गाने वळवायची यासाठी पर्यायी मार्गांचीसुद्धा पाहणी केली. या वेळी बडनेरावरून येणारे वाहन गोपालनगर टी पॉइंटवरून वळवून जुन्या बायपास मार्गे जाणार असल्याचे ठरवले आहे.

नागपूरजाणाऱ्या बसेस जुन्या बसस्थानकावरूनच! : राजापेठचौकातील कोंडी सोडवण्यासाठी राजापेठ बसस्थानकावर केवळ अकोला यवतमाळवरून येणाऱ्याच एसटी बसेस जातील. तसेच याच बसेस राजापेठवरून अकोला आणि यवतमाळच्या दिशेने परत जाईल. मात्र, याव्यतिरिक्त इतर सर्व बसेस जुन्या बससथानकावरून सोडाव्यात, असेही पाहणीदरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. काही दिवसांपूर्वीच एसटीने नागपूर जाणाऱ्या बसेस राजापेठ स्थानकावरून सुटतील, असे जाहीर केले आहे. या बसेस राजकमल चौक, राजापेठ मार्गेच बडनेराकडे जात आहे त्याचमार्गे परत येत आहे. मात्र, यापुढील काळात अकोला किंवा यवतमाळवरून अमरावती मार्गे पुढे जाणाऱ्या सर्व बसेस बडनेरावरूनच जुन्या बायपास मार्गे वळवून दस्तुरनगर, यशोदानगर, चपराशीपुरा मार्गे बसस्थानकात येतील. तसेच नागपूरकडून येऊन अकोला, यवतमाळच्या दिशेने जाणाऱ्या बसेससुद्धा चपराशीपुरा चौक, यशोदानगर, दस्तुरनगर या जुन्या बायपासने बडनेरा जाव्यात, असा प्रस्ताव पोलिसांनी मांडला आहे. पाहणीच्या वेळी एसटीच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मान्य केला असला तरी एसटीचे वरिष्ठ अधिकारी यासंदर्भात काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

चौकालगतचा जवळपास तीनशे मीटरचा परिसर नो पार्किंग झोन
राजकमलकडेयेणाऱ्या मार्गावर, बडनेराकडे जाणारा मार्ग तसेच कंवरनगरकडे जाणाऱ्या मार्गावर पुलाचे काम सुरू झाले आहे. काम सुरू असल्यामुळे टिनपत्रे लावण्यात आले आहे. काही वाहनचालक याच टिनपत्र्यांना लागून वाहन उभे करतात. मात्र, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे राजापेठ चौकात ज्या ठिकाणी टिनपत्रे लावण्यात आले आहे, असा जवळपास ३०० ते ४०० मीटर मार्गाचा परिसर पूर्णत: नो पार्किंग झोन' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातही पोलिस महापालिकेकडून लवकरच सूचना फलक लावण्यात येणार आहे.

लवकरच काढणार अधिसूचना
राजापेठ चौकातून जड वाहनांना प्रवेशबंदी केल्याशिवाय चौकातील वाहतुकीची कोंडी कमी होणार नाही. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी पर्यायी मार्गाची पाहणी केली. त्यामुळेच राजापेठ चौकातून एसटी बसेससह सर्वच जड वाहनांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जड वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून गोपालनगर टी पॉइंट मार्गे जुन्या बायपासचा वापर करता येईल. यासंदर्भात लवकरच अधिकृत अधिसूचना आम्ही काढणार आहोत. नितीन पवार, पोलिसउपायुक्त (वाहतूक).