आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालय १२७ एकरांचे, सुरक्षा रक्षक केवळ दहाच, जिल्हा रुग्णालयाकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ-येथीलकै. वसंतराव नाईक जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर तब्बल १२७ एकरात पसरला आहे. मात्र या १२७ एकरच्या मोठ्या परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा सध्या केवळ १० सुरक्षा रक्षकांच्या भरवशावर सुरू असल्याने त्या ठिकाणी अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.

येथील वसंतराव नाईक जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात जिल्ह्यासह परजिल्ह्यातून आणि परराज्यातून बरेच रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांची संख्या दररोज हजारोमध्ये असते. या मोठ्या संख्येने येणाऱ्या रुग्णांना योग्य उपचार मिळावे, यासाठी रुग्णालयाच्या परिसरात विविध इमारती उभारून त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, शिक्षण घेणारे शिकाऊ वैद्य आणि डॉक्टर यांच्याही वसाहती या ठिकाणी आहेत. या सर्व इमारती १२७ एकरच्या परिसरात पसरलेल्या आहेत. त्यामुळे या परिसरात विविध ठिकाणी सुरक्षा रक्षकांची गरज पडते. त्यासाठी तब्बल ६७ सुरक्षा रक्षकांची तातडीने गरज आहे. असे असताना जिल्हा रुग्णालयाच्या या १२७ एकरच्या परिसराच्या सुरक्षेसाठी केवळ १० सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत.

रुग्णालय परिसरात असलेली विद्यार्थ्यांची आणि निवासी डॉक्टरांची वसतिगृहे, रुग्णालयातील बाल विभाग, ओपीडी, अपघात विभाग, प्रवेशद्वार, विविध इमारती या सर्व ठिकाणी दोन पाळीत सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज आहे. त्यासोबतच या ठिकाणी येणाऱ्या हजारो रुग्णांपैकी काही रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात होणारे वाद, वेळोवेळी करण्यात येणारी आंदोलने याप्रसंगी सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्यासाठीही सुरक्षा रक्षकांची गरज आहे. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णालय प्रशासनाच्या वतीने वारंवार सुरक्षा रक्षकांची पदे भरण्याची किंवा कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्या मागणीवर कुठलाही ठोस निर्णय शासनस्तरावर घेण्यात आलेला नाही. त्यामुळे रुग्णालयातील सुरक्षेचा मुद्दा आज एेरणीवर आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची तातडीने नेमणूक करण्याची मागणी होत आहे.

१६अतिरीक्त सीसीटीव्ही लागणार
जिल्हारुग्णालयाच्या इमारतीत कारभार सुरळीत व्हावा आणि त्यावर योग्य मॉनेटरिंग व्हावे, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, त्यासोबतच आता सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात आणखी १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा बसवण्यात मदत होईल. मात्र तोपर्यंत तरी येथील १० सुरक्षारक्षकांवरच सर्व सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे.

अधिष्ठात्यांनी पकडला चोर
जिल्हारुग्णालय परिसरात भंगार चोरीच्या घटना वाढत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी स्वत: वैद्यकीय अधिष्ठाता यांनी रुग्णालयाच्या परिसरात फेरफटका मारण्यास सुरुवात केली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी असेच फिरत असताना त्यांनी एका चोरट्याला रुग्णालयाच्या खडकीची ग्रील कापून चोरून नेताना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

रात्री चालतात गैरप्रकार
रुग्णालयाचापरिसर १२७ एकरात पसरला असून, त्यात अनेक ठिकाणी मोकळी जागा आहे. या भागात असलेला अंधार आणि रात्रीच्या वेळी कमी असलेली वर्दळ याचा फायदा घेत अनेक अपप्रकार चालतात. काही दिवसांपूर्वी याच परिसरात एका मुलीला मारून लुटल्याची घटना घडली होती. वाटमारीच्या घटनाही येथे घडल्यात.

शासनाकडे सुरक्षारक्षकांची वारंवार मागणी केली आहे
जिल्हारुग्णालयाचा परिसर मोठा असून, त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षकांची नितांत गरज आहे. त्यासाठी ६७ सुरक्षा रक्षकांची मागणी केली आहे. त्यासाठी वारंवार पाठपुरावाही करण्यात येत आहे. मात्र, या मागणीसंदर्भात अद्यापही कुठलाच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. डॉ.राठोड, वैद्यकीय अधीष्ठाता.

मागितले ६७ सुरक्षारक्षक मिळाले मात्र केवळ १०
जिल्हारुग्णालयाच्या परिसरात असलेल्या इमारती आणि विभाग या ठिकाणी ६७ सुरक्षा रक्षकांची गरज असल्याची मागणी करण्यात आली आहे. त्यातही २० सुरक्षा रक्षकतातडीने नियुक्त करण्याचे सांगण्यात आले आहे. असे असताना केवळ १० कंत्राटी सुरक्षा रक्षकांची मान्यता देण्यात आली आहे. रुग्णालयातील काही सुरक्षा रक्षकांचीबढती झाल्याने तीही पदे रिक्त आहेत. मात्र अजूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष गेलेले नाही.