आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् मुख्याध्यापिकेच्या सुटीकरिता कागदावर शिजली चवदार खिचडी, अमरावतीमधील भन्नाट प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा- दुसऱ्यादिवशी सुटीवर जायचे आहे म्हणून मुख्याध्यापिकेने एक दिवस आधी कागदावरच खिचडी शिजवून त्याचे वाटप विद्यार्थ्यांना केले. अफलातून बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी कागदावरच खिचडी ‘चवदार’ असल्याचा अभिप्राय नोंदविल्याचा भन्नाट प्रकार गुरुदेव नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उघडकीस आला. यावरून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अनागोंदी या निमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. 

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थांना देण्यात येणाऱ्या खिचडीची गुणवत्ता ही विद्यार्थांना खचडीचे वाटप करण्यापुर्वी चव घेऊन त्याचा शेरा, चव नोंदवहीत मांडवा लागतो, परंतु गुरूदेव नगर येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका लता खणकणे यांनी शालेय कामानिमित्त सुटीवर जाणार असल्याने त्यांनी शनिवारची खिचडी शुक्रवारीच कागदावर शिजवली. इतकेच नव्हे तर खिचडी चवदार झाल्याची नोंदही विद्यार्थ्याच्या सहीनिशी चव नोंदवहीत केली. विशेष म्हणजे हा अफलातून प्रकार शुक्रवारी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती जयंत देशमुख यांनी दिलेल्या आकस्मिक भेटीत पुढे आला.

विशेष म्हणजे या सर्व अनागोंदी कारभाराचा प्रभार मुख्याध्यापिकेने सुटीवर जाण्यापुर्वीच शाळेतीलच देवळे नामक शिक्षिकेकडे सोपविला होता. विशेष बाब ही की, मुख्याध्यापिका खणकणे यांनी नोंंदवहीत समोरच्या तारखेतही शैक्षणिक कामानिमित्त जात असल्याने सुटीवर असल्याचे नमूद होते. मात्र याची कुठलीही माहिती गटशिक्षणाधिकारी यांना नसल्याचे भेटीमध्ये पुढे आली. शिक्षण सभापतींनी शाळेतील नोंदवहींची तपासणी केली असता, हा सर्व प्रकार समोर आला. मुख्याध्यापिकेच्या या बेजबाबदार कारभाराबाबत शिक्षण सभापतींनी नाराजी व्यक्त करीत सर्व नोंदवह्या सील केल्यात. या वेळी जिल्हा परिषद सदस्य गजानन राठोड, सरपंच बबलू मक्रमपुरे, नंदकिशोर आवारे, कपिल निर्गुण आदी उपस्थित होते. 

संबंधित अधिकारी कारवाई करेल 
माझ्या मुलाचा अपघात झाल्याने मी 5 तारखेपासून रजेवर होती. तात्पुरता प्रभार ढाकूलकरांकडे सोपवला होता. मुख्याध्यापिका खणकणे यांनी सुटीची कुठलीही पूर्वसूचना दिली नाही. संबंधित अधिकारी त्यावर कारवाई करेल.
- उषा शेंडे, गटशिक्षणाधिकारी, पं.स.तिवसा. 

बुधवारपर्यत कारवाई होईल 
गुरुदेवनगर येथील जि.प. शाळेतील मुख्याध्यापिका यांनी कामात कसूर करुन नियमांचे उल्लंघन केल्याने त्या शिक्षेस पात्र आहेत. या संदर्भात बुधवारपर्यंत कारवाई करण्यात येईल.
- श्रीराम पानझडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद, अमरावती. 
 
जबरदस्तीने लादला एचएम पदाचा भार 
मी मुध्याध्यापिकेचे पद घ्यायला नकार दिला होता, तरी हे पद मला दिले. शेरा लिहिण्यात काही खोडतोड झाली असेल, परंतु ज्या दिवशीची खिचडी त्याच दिवशी शिजते.
- लता खणकणे, मुख्याध्यापिका. 
बातम्या आणखी आहेत...