अमरावती- सिनेअभिनेत्री किम शर्मा हिने “मोहब्बते’मधील गाण्यावर केलेले नृत्य तर इमरान हाशमीने सादर केलेले “तेरा तेरा सुरूर’च्या तालावर अमरावतीकर तरुणाई थिरकली. युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने नवाथे चौकात रविवारी (२० ऑगस्ट) आयोजित केलेल्या दहिहांडी स्पर्धेला महाभारत नाटिकेतील अर्जुनाची भूमिका साकारणारे फिरोज खानदेखील उपस्थित होते.
कार्यक्रमाला दुपारी १.३० च्या सुमारास सुरूवात झाली, यावेळी आमदार रवी राणा, आयुक्त हेमंत पवार, नवनीत राणा आदी उपस्थित होते. त्यानंतर सिने अभिनेत्री किम शर्मा, अभिनेता इमरान हाशमी यांनी दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. किम शर्मा आणि इमरान हाशमी यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सहा शहीद कुटुंबांच्या परिवाराला आर्थिक मदत करण्यात आली. शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटंुबातील सदस्यांना देखील आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले. बोरगाव येथील सविता भास्कर धवणे, भातकुली येथील उषा रमेश वर्धे, सायत येथील पद्मा गजानन मिसाळ, बोडणा येथील सावित्री रामराव राठोड, उत्तमसरा माला रमेश झाडे यांचा समावेश होता.
उत्तमसरा येथील संगीता या महिला शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने त्यांचे पती विलास धांडे यांना, अासरा येथील सुरेश उकटे यांनी आत्महत्या केल्याने त्यांचे भाऊ श्याम उकटे यांना, खालकोनी येथील अतुल रौराळे यांनी आत्महत्या केल्याने त्यांचे वडील रामराव बबन रौराळे यांना तर आसरा येथील अभिजीत ज्ञानेश्वर मोहोड यांना मदतीचे धनादेश देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. डाॅ. राकेश बडगुजर, बालकिसन पांडे, रामदास जसेकर, चंदू सोजतिया यांनी केले. संचालन नाना आमले, विनोद गुहे शैलेश कस्तुरे यांनी केले.