आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्रीय विद्यापीठाला अमरावती येथे जागा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - तत्कालीन संपुआ सरकारच्या कार्यकाळात प्रस्तावित करण्यात आलेल्या केंद्रीय विद्यापीठाकरिता (सेंट्रल युनिव्हर्सिटी) अमरावती नजीक ४५३ एकर जागा उपलब्ध होऊ शकते, अशी तयारी जिल्हा प्रशासनाने दर्शवली आहे. या जमिनीचे बाजार मूल्य १६ कोटी ७३ लाख ७७ हजार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात आमदार डाॅ. सुनील देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गुरुवारी झालेल्या बैठकीत या जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी अमरावती येथे केंद्रीय विद्यापीठ साकारण्यास तत्त्वत: मान्यता दर्शवली होती. मात्र, मागील काही वर्षांपासून यासंदर्भात कोणतेही पाऊल प्रशासनाने उचलले नव्हते. त्यामुळे आमदार डाॅ. देशमुख यांनी केंद्रीय विद्यापीठ अमरावतीत व्हावे, यासाठी सन २०११ मध्ये जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. या जनहित याचिकेवरून उच्च न्यायालयाने प्रधान सचिव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, प्रधान सचिव, उच्च तंत्रशिक्षण महाराष्ट्र यांच्यासह विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून विचारणा केली आहे. अमरावतीत केंद्रीय विद्यापीठ होण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने यांचे म्हणणे मागवले आहे.

या अनुषंगाने गुरुवारी तातडीची बैठक बोलावून आमदार डाॅ. देशमुख यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अमरावती येथे प्रस्तावित केंद्रीय विद्यापीठ अमरावतीत साकारले, तर विद्यापीठाच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाचे मोठे केंद्र उदयास येणार आहे.

शिक्षणाचे प्रमुख केंद्र
अमरावती येथे केंद्रीय विद्यापीठ झाल्यास देशभरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक या ठिकाणी सेवा अध्ययनासाठी येतील. राज्यात अमरावती हे शिक्षणाचे प्रमुख केंद्र होईल. विदर्भातील विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. त्यामुळे केंद्रीय विद्यापीठ अमरावती येथेच व्हावे, यासाठी पाठपुरावा सुरू केल्याची माहिती बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डाॅ. देशमुख यांनी दिली.

नि :शुल्क जमिनीसाठीही प्रस्ताव पाठवणार
हा२०११-१२चा विषय आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने केंद्रीय विद्यापीठाच्या जागेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच वित्त विभागाशीही पत्रव्यवहार केला. त्यामुळे शासनाने नांदगावपेठजवळ जागा देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही जागा देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, ही जागा नि :शुल्क देण्यात यावी, असा प्रस्ताव आहे. त्यामुळे राज्य शासनाकडे नि :शुल्क जमिनीची मागणी केली आहे. किरण गित्ते, जिल्हाधिकारी, अमरावती

नि:शुल्क जागेसाठी पाठपुरावा करू
विदर्भातील अमरावती शहराचे नाव केंद्रीय विद्यापीठामुळे उंचावणार असल्यामुळे तसेच देशभरातील विद्यार्थी प्राध्यापक येथे येणार असल्याने या शिक्षणाच्या केंद्रासाठी राज्य सरकारला जागा देण्यास काहीच हरकत नसावी. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून नि:शुल्क जागा मिळावी म्हणून पाठपुरावा करणार आहोत. डाॅ.सुनील देशमुख, आमदार, अमरावती.
बातम्या आणखी आहेत...