आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, मार्डी ते कारला मार्गावरील दोन दिवसांपूर्वीची घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील मार्डी ते कारला मार्गावर एका झुडुपाजवळ गुरुवारी (दि.२१) वन विभागाच्या पथकाला मृतावस्थेतील बिबट आढळून आला. मृतक बिबट मादी असून, तिचे वय जवळपास ११ महिने असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच तिचा मृत्यू अपघातात जखमी झाल्यानंतर कडाक्याच्या ऊनाने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मार्डीवरून कारल्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी वन विभागाचे पथक गस्त घालत होते. त्याच वेळी एका झुडुपाजवळ बिबट मृतावस्थेत दिसून आला. तत्काळ ही माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्या वेळी वन विभागाचे अधिकारी पशुवैद्यकीय चिकित्सकांची चमू घटनास्थळी दाखल झाली. मृतक बिबट ही मादी असून, तिला दोन दिवसांपूर्वी भरधाव वाहनाची धडक बसली. या धडकेत या मादी बिबटच्या अंगावरील अनेक ठिकाणावरची कातडी घासल्यामुळे जखमा झाल्या होत्या. दरम्यान, सध्या प्रचंड ऊन आहे. जेमतेम ११ महिन्यांचे बिबट, त्यात शरीराला असलेल्या जखमा वरून कडाक्याचे ऊन यामुळे बिबटचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे, सहायक वनक्षेत्र अधिकारी राजेंद्र बोंडे, पशुवैद्यकीय चिकित्सक डॉ. चिठोरे त्यांच्या चमूने घटनास्थळीच मृत बिबटचे विच्छेदन केले. त्यानंतर या बिबटला त्याच ठिकाणी अग्नी देण्यात आला, अशी माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

अपघातामुळे बिबटचा मृत्यू : जवळपास११ महिने वय असलेल्या मादी बिबटचा गुरुवारी मृतदेह आढळून आला. भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत या बिबटच्या शरीरावर जखमा होत्या. यातच कडाक्याचे ऊन यामुळेच बिबटचा मृत्यू झाला असावा. शवविच्छेदन करून त्याच ठिकाणी बिबटला अग्नी देण्यात आला, असे चांदूर रेल्वेचे आरएफओ अनंत गावंडे यांनी सांगितले.