आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळात विजांचे तांडव; पावसाची नावापुरती हजेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - शहरात आज, दि. १२ सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजताच्या सुमारास विजांचे तांडव झाले. तब्बल २५ ते ३० मिनिट सातत्याने आकाशात विजा चमकत होत्या. यातून कुठल्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली. असे असलेतरी पावसाने केवळ निमित्ता पुरतीच हजेरी लावली. वातावरणात गारवा निर्माण करण्यापुरताच पाऊस जिल्ह्याभरात झाला आहे. 
 
यंदा पावसाने जिल्ह्यावर अवकृपा दाखवली आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे यंदा सरासरी पाऊस होईल, असा कयास लावल्या जात होता. असे असले तरी पावसाने वेळी अवेळी हजेरी लावली. सुरुवातीच्या काळात बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरण्या आटोपून घेतल्या. तद्नंतर सातत्याने पावसाने हुलकावणी दिली. केवळ पिकांना दिलासा मिळेल, असा पाऊस पडत होता. यंदा थोड्याथोड्या अंतराने सरासरी ३० ते ३५ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. अशात यवतमाळ शहरात तर पावसाचा पत्ताच नाही. परिणामी, शहराला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण अद्यापही कोरडे ठाक पडलेले आहे. तर सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चापडोह धरणातील जलसाठाही केवळ २२ टक्यावर येऊन पोहचला आहे. अशा परिस्थितीत केवळ आभाळाकडे डोळे लावण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय राहिला नाही. गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हुलकावणी दिली. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. 

तेव्हापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने केवळ ढगाळ वातावरणावर समाधान मानण्याची वेळ आली. अशात आज, दि. १२ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. दरम्यान, सहा वाजताच्या सुमारास आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला. तब्बल २५ ते ३० मिनिट विजांचा तांडव सुरू होता. तालुक्यात कुठेही वीज पडल्याची घटना घडली नाही, परंतू विजांचा तांडव सुरू असल्यामुळे यवतमाळवासींयामध्ये चांगलीच भितीचे वातावरण पसरले होते. अशात काहीवेळासाठी पाऊस आला, वातावरणात गारवा निर्माण करून पावसाने परतीचा मार्ग निवडला. विशेष म्हणजे जिल्ह्याभरातील सोळाही तालुक्यात ढगाळी वातावरण निर्माण झाले होते. दिवसभर ढगाळी वातावरण असताना दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, नेर, आर्णी, वणी, बाभुळगाव, कळंब, मारेगाव, झरीजामणी, तसेच घाटंजी परिसरातही सायंकाळपर्यंत ढगाळी वातावरण होते. 

तर यवतमाळ, उमरखेड, महागाव, पांढरकवडा, राळेगाव परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. एकंदरीत सप्टेंबर महिन्यात पावसाची परिस्थितीत पाहता अत्यंत चिंताजनक असून, येत्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही, तर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. 
 
उकाड्यात झाली वाढ 
आजसकाळच्या सुमारास थोड्यावेळासाठी आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला होता. तद्नंतर पावसाची प्रतिक्षा सुरू असताना बराचवेळ केवळ ढगाळी वातावरण दिसून येत होते. दुपारच्या सुमारास उकाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. असे असलेतरी शहरात पावसाने सायंकाळपर्यंत आगमन केलेच नव्हते. 
 
दिवसभरात सरासरी ७.६४ मिमी पाऊस 
जिल्ह्यात सोमवारी काही तालुक्यात तुरळक असा पाऊस झाला होता. दरम्यान, आज, दि. १२ सप्टेंबर रोजी पहाटेपासूनच वातावरण ढगाळी असल्यामुळे जिल्ह्याभरात सर्वदुर पाऊस पडेल, अशी शक्यता होती. मात्र, पावसाने केवळ काहीच तालुक्यात हजेरी लावली. आज पहाटेपर्यंत कवेळ ७.६३ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. 
 
जिल्ह्यात आतापर्यंत ५०५ मिमी पाऊस 
जिल्ह्यात सरासरीच्या ५०४.९८ मिमी पाऊस झाला. यामध्ये यवतमाळ ३११, बाभुगाव ५५६, कळंब २९७, आर्णी ५६१, दारव्हा ४११५, दिग्रस ५३३, नेर ४९८, पुसद ७९२, उमरखेड ४३२, महागाव ४२२, केळापूर ५८६, घाटंजी ६३२, राळेगाव ३२९, वणी ६९९, मारेगाव ४७२, झरीजामणी ५४४ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. 
बातम्या आणखी आहेत...