आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पशुधन आले संकटात ,शेतकऱ्यांच्या पुढे जनावरे जगवण्याचा यक्षप्रश्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवदा - यंदा झालेल्या अल्प पाऊस निसर्गाचा लहरीपणा यामुळे खरिपासोबतच रब्बीचीही पिकेही हातातून गेल्याने बळीराजा कमालीचा हवालदिल झाला. त्यातच आता पशुधन जगवण्यासाठी शेतकऱ्यांना आता चाराटंचाईचा सामना करावा लागत आहे. या दुष्काळी परिस्थितीचा फटका शेतकऱ्यांसोबतच जनावरांनादेखील बसत आहे. चाऱ्याअभावी पशुधनाची लालनपालन करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, अशीच परिस्थिती राहिल्यास पशुधन विकण्याशिवाय गत्यंतर नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
सातत्याने तिसऱ्या वर्षीही निसर्गाच्या लहरीपणाला बळी पडल्याने आर्थिकदृष्ट्या कमजोर झालेल्या शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. तूर, मूग, कपाशी, सोयाबीन, ज्वारी इत्यादी पिकांनी दगा दिल्याने तसेच शेतमालाच्या घसरलेल्या दराने हतबल झालेल्या शेतकऱ्याला जनावरांचे पालनपोषन करावे तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अत्यल्प पावसामुळे जानेवारीतच शेतीची उलंगवाडी झाल्याने दिवसागणिक चाराटंचाईची समस्या शेतकऱ्यांपुढे उभी ठाकली आहे. शेतकऱ्यांना पशुधनासाठी चारा मिळेनासा झाला आहे. निसर्गाचा लहरीपणामुळे वन्यप्राण्यांचा हैदोस, कीड यामुळे ज्वारीचे पीकही घेता आले नाही. परिणामी, गुरांच्या चाऱ्यासाठी मुख्य असलेले कडबा-कुटार मिळेनासे झाले आहे. गुरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यातच गावागावांत चराईकरिता असलेली गायराने कमी पावसामुळे ओस पडली आहेत, तर काही ठिकाणी गायरानेच उरली नसल्यामुळे दिवसभर मिळेल ते खाऊन कसेबसे जनावरे आपले पोट भरण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.

सद्य:स्थितीत तुरीचे कुटार ८०० ते १००० रुपये प्रती क्विंटलप्रमाणे, तर हरभऱ्याचे कुटार ६०० ते ७०० रुपये प्रती क्विंटल, कडब्याचे कुटार १३०० ते १५०० रुपये प्रती क्विंटल, गवंड्याचे कुटार ४०० ते ५०० रुपये प्रती क्विंटल अशा दराने विक्री होत अहे. कडबा तब्बल हजार ते हजार रुपये प्रती शेकडा दराने मिळत आहे. जिथे पोटापाण्यासाठीच काही पिकले नाही, तिथे पशुधन कसे जगवावे, या चिंतेने बळीराजाला ग्रासले आहे.

प्रपंच कसा चालवावा?
^दुधाचा व्यवसायकरून उपजीविका चालवण्यासाठी गाई, म्हशी पाळल्या आहेत. परंतु, गेल्या दोन, तीन वर्षांपासून पावसाअभावी उत्पादन होत नसल्यामुळे चाराटंचाई निर्माण झाली आहे. चाऱ्याअभावी गाई, म्हशी विकल्या, तर प्रपंच तरी कसा चालवावा? गजानन चिंचोळकर, दूधव्यवसायिक, पिंपळोद.

चाऱ्या नसल्याने दगावताहेत जनावरे
^पोटभर चारामिळत नसल्याने जनावरे मिळेल ते खातात. त्यामुळे त्यांना अपचनासारखे आजार होतात. परिणामी, जनावरे आजारी पडत आहेत. त्यामुळे वेळ प्रसंगी जीवालाही मुकावे लागत आहे. एकीकडे आजारी जनावरांच्या उपचाराचा खर्च तर दुसरीकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा. श्रीधर हिवसे, शेतकरी,येवदा.

चाऱ्याअभावी विकावे लागतेय पशुधन
^निसर्गाच्या लहरीपणामुळे चाराटंचाई निर्माण झाली आहे. किंमत मोजूनही चारा मिळेनासा झाला आहे. परिणामी, पशुधन विकण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर आली आहे. शासनाने यावर उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. बंडू वांदे, शेतकरी,येवदा.

प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी
^प्रशासनाच्या नियोजन शून्य काभारामुळे गावागावांत असलेली गायराने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यावर त्वरित काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसे केल्यासच पशुधनाचासाठी चारा उपलब्ध होऊ शकतो. अन्यथा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण होईल. मंगेश डिवरे, शेतकरी,वरुड कुलट.


-----------------------------