अमरावती - शेततळे तयार करण्यासाठी स्थानिकांकडे कौशल्य नसल्यामुळे यातून मिळणारा रोजगार इतर राज्यातील लोकांना मिळत होता. मात्र कौशल्य विकास विभागातर्फे ट्रॅक्टर चालकांना शेततळे निर्माण करण्याच्या उद्देशाने दिलेल्या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्यासोबतच स्थानिकांना रोजगारही मिळेल, असे मत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी व्यक्त केले.
जलयुक्त शिवार योजना आणि प्रमोद महाजन कौशल्य उदयोजकता विकास अंतर्गत शुभम मंगल कार्यालय येथे आयोजित ट्रॅक्टर चालक प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उपसंचालक कौशल्य विकास महेश देशपांडे, तहसीलदार राहुल तायडे उपस्थित होते. जिल्ह्यात सद्य स्थितीत शेततळे तयार करण्यासाठी राजस्थानी लोक येतात. कारण स्थानिकांमध्ये त्यांच्यासारखे कौशल्य नसते. स्थानिकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी ट्रॅक्टर चालकांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत दर्यापूर तालुक्यातील शेततळे तयार करण्यासाठी ट्रॅक्टर चालक मालक तसेच शेततळे उभारण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत स्थानिकांना ट्रॅक्टर चालवण्याचे प्रशिक्षण देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. दर्यापूर अंजनगाव तालुक्यात ११०० च्या वर शेततळे तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याने त्यासाठी ट्रॅक्टर सह कुशल मनुष्यबळ तयार करणेही आवश्यक आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षित ट्रॅक्टर चालक तयार झाल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. या कौशल्य विकास कार्यक्रमात ११५ ट्रॅक्टर चालकांची नोंदणी झाली.
या कार्यशाळेत कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाचे अधिकारी महेश अग्रवाल संचालक, करिअर कॅम्प्युटर ॲन्ड टेक्निकल इन्स्टिट्युट दर्यापूर तसेच कार्यशाळेत तालुक्यातील महसूल विभागाचे लिपिक, तलाठी मंडळ अधिकारी उपस्थित होते.