आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांच्या घरच्या लग्नातील बडेजाव व्यक्तिश: मान्य नाही, मा. गो. वैद्य यांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - लग्नादी मंगल कार्यात प्रत्येक व्यक्ती आपली ऐपत आणि क्षमतेप्रमाणे खर्च करते. पण राजकीय नेत्यांच्या परिवारातील लग्नात बडेजाव करावा हे आपल्याला वैयक्तिक पातळीवर मान्य नसल्याचे संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या मुलांच्या शाही विवाहाची राज्यभरात चर्चा आहे. याबाबत विचारले असता ते बोलत होते. 
 
आपल्या परिवारातील लग्नात कुणी कसा खर्च करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करते. यासंबंधी कुठलाच कायदा करता येत नाही, असे मा. गो. म्हणाले. आपल्या घरच्या लग्नात खर्च करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असून किती आणि कसा खर्च करायचा याचा विचार प्रत्येकानेच करावा. 

संघद्वेषातून कम्युनिस्ट हल्ले:  देशातील कम्युनिस्ट नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला शत्रू मानतात. म्हणून संघ स्वयंसेवकांवर जीवानिशी हल्ले होणे कार्यालयावर बॉम्बहल्ले करण्यासारख्या घटना तेथे सातत्याने घडतात, असे वैद्य म्हणाले. संघाची विचारधारा राष्ट्रवादी तर तर कम्युनिस्टांची आंतर-राष्ट्रवादी असल्याचे सांगत हा विचारधारेचा संघर्ष असल्याचे ते म्हणाले. मध्य प्रदेशच्या उज्जैन येथील संघाचे सहप्रचारप्रमुख कुंदन चंद्रावत यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यासबंधी घोषणा केल्याबद्दल विचारले असता संघाचा हिंसेवर विश्वास नसून संघाला असे विधान कदापि मान्य नसल्याचे वैद्य यांनी स्पष्ट केले. 

भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा 
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत बुरखाधारी महिलांचा पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी भाजपने केली आहे. बुरख्याचा गैरवापर करून कदाचित पुरुष मतदान करत असल्याचा अनुभव भाजपला आला असेल म्हणून तशी मागणी पक्षाने केली असेल, असे म्हणता त्यांनी भाजपच्या मागणीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम लोकसंख्या मोठी असल्याने अशी घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता भाजपने निवडणूक आयोगाला त्यासंबंधी पत्र लिहिले असेल, असे देखील ते म्हणाले. बुरख्याचा गैर वापर करून बोगस मतदान होण्याची शक्यतादेखील लावून धरली. 
 
बातम्या आणखी आहेत...