आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला संपवायचे असेल तर पिस्तूल घेऊन पाठवा, मा.गो. वैद्य यांचा राज यांना खोचक सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी माझ्या वयाची चिंता करू नये. मी सध्या ९३ वर्षांचा आहे. आणखी सात वर्षे निश्चित जगणार आहे. त्याअगोदरच मला संपवायचे असेल तर कोणाला पिस्तूल घेऊन पाठवा, असा खोचक सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी शनिवारी नागपुरात बोलताना दिला.
संघाचे नेते मा. गो. वैद्य यांच्या विदर्भ राज्याच्या भूमिकेवर टीका करताना त्यांची पृथ्वीपासून स्वतंत्र होण्याची वेळ आली आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी त्यांच्या वयाचा संदर्भ जोडून केली होती. शनिवारी नागपुरात तिरपुडे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अॅन्ड रिसर्च संस्थेच्या वतीने वैद्य यांचे लहान राज्याची संकल्पना विकास या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानानंतर आयोजित प्रश्नोत्तराच्या सत्रात वैद्य यांनी राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले. वैद्य म्हणाले, ज्याला जी भाषा येते, तो त्या भाषेचा प्रयोग करतो. प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मी म्हातारा आहे हे खरेच आहे. शेवटी सर्वांनाच मृत्यू येणार आहे. आज मी ९३ वर्षांचा आहे. आणखी सात वर्षे निश्चित जगणार आहे. पण कोणाला त्या अगोदरच मला संपवायचे असेल तर पिस्तूल घेऊन पाठवा, असा खोचक सल्ला त्यांनी या वेळी दिला.
राज्य पुनर्रचना आयोग नेमा : छोटीराज्ये नेहमीच प्रशासकीयदृष्ट्या सोयीची ठरतात. त्यामुळे देशातील सर्वच राज्यांच्या आकाराचा फेरविचार करण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोग नेमावा आयोगाच्या शिफारशीनुसार नवी राज्ये तयार व्हावीत, असेही वैद्य म्हणाले.
अस्मितेचे नुकसान नाही
देशातील काही राज्य २० कोटी लोकसंख्येची तर काही १५ लाखांची आहे. लोकसंख्येची ही विषमता दूर झाली पाहिजे. कमाल कोटी किमान ५० लाखांचे एक राज्य असावे, असे आपले व्यक्तिगत मत आहे. त्या न्यायानेच महाराष्ट्राची चार राज्य होऊ शकतात, असे आपण नमूद केले होते. महाराष्ट्राचे तुकडे करावे, असे शब्द कधीही वापरले नाहीत, असे स्पष्टीकरण देऊन वैद्य म्हणाले की, राज्य नेमके किती लोकसंख्येचे असावे हे पुनर्रचना आयोग वा सरकारनेच ठरविले पाहिजे. एका भाषेची अनेक राज्य झाली तरी भाषेचे वा अस्मितेचे कुठलेही नुकसान होत नाही. तेलंगणाच्या निर्मितीमुळे तेलुगु भाषेची आता दोन राज्य झाली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. एक भाषा, एक राज्य ही संकल्पना योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाची गरज पडू नये
वेगळ्याराज्यासाठी लोकांना आंदोलनाची गरज पडू नये. लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. हिंसेच्या दबावाखाली निर्णय होऊ नये. विदर्भाचे राज्य सक्षम होणार की कसे हे ठरवण्याचा अधिकारी विदर्भातील जनतेलाच आहे. तो इतरांना नाही, असेही ते म्हणाले.
भूमिकासंघाची नाही
आपणमांडत असलेली भूमिका संघाची नाही. ती आपली व्यक्तिगत भूमिका आहे. विदर्भाबाबत संघाने अद्याप आपली भूमिका मांडलेली नाही. तसेही संघ अशा राजकीय विषयांमध्ये पडत नाही. भाजपची भूमिका भाजपलाच विचारा, असेही त्यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.