आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळजी घ्या : राज्यासह देशातील अनेक भागांत उष्णतेची लाट, आणखी 48 तास कायम राहणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात आगामी दोन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने तसा इशारा दिला आहे. गुजरातेतील कच्छ व सौराष्ट्रात सध्या उष्णतेची तीव्र लाट आहे. तसेच अरबी समुद्रावरून येणारे वारेही उष्मा वाढवत आहेत. हीच स्थिती येत्या ४८ तासांत कायम राहणार असल्याने राज्यात अनेक भागांत पारा आणखी चढण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक ४५.२ सेल्सियस अंश तापमान नोंदवले गेले.

तीन दिवसांपासून राज्यात बहुतेक शहरे वाढत्या तापमानाने होरपळत आहेत. राज्यातील तब्बल २५ शहरांचे कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक नोंदवले गेले आहे. किमान तापमानही सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांनी अधिक असल्याने रात्रीही प्रचंड उकाडा जाणवत आहे. विदर्भातील बहुतेक शहरांत पारा ४१ ते ४४ अंशांच्या दरम्यान आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत त्यात अजून एक ते दोन अंशांनी वाढ होऊ शकते, असे आयएमडीचे हवामान विभागप्रमुख ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले.

मराठवाड्यात परभणीत सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सियस तापमान
मराठवाड्यातही सूर्य आग ओकत आहे. शनिवारी परभणी येथे सर्वाधिक ४३.८ अंश तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल नांदेडमध्ये ४३.०, उस्मानाबाद ४२.०, हिंगोली ४२.०, औरंगाबाद ४१.७ तर बीड, जालना आणि लातूरमध्ये ४१.० अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 
 
का चढलाय पारा?  
- मराठवाडा व उत्तर कर्नाटकमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचे चक्राकार वाऱ्यात रुपांतर होऊ शकते. त्यामुळे दमटपणा वाढला.
- राजस्थानवरून उष्ण व कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत असल्याने तापमान वाढले आहे. 
- वायव्य भारतात ऊन वाढल्याने महाराष्ट्रात उष्ण वारे वाहत आहेत. 
- हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने उन्हाची तीव्रता आणखीच वाढली आहे.

उत्तर भारतातही उष्णतेचा कहर, पारा चाळिशीत
शुक्रवार, शनिवारी उत्तर भारतातील बहुतांश भागांत तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पारा चाळिशीच्या पुढे गेला होता. ओडिशा आणि राजस्थानसह गुजरातेत तापमान वाढले. दिल्लीत पुढील आठवड्यात पारा ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी ही खबरदारी घ्या
- सुती कपड्यांचा वापर वाढवावा. घराबाहेर पडताना गॉगल्स, छत्री, टोपी वापरावी.
- शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी लस्सी, लिंबू पाणी, ताक सेवन करावे.
- दुपारी १२ ते ३.३०  या काळात घराबाहेर पडणे व शारीरिक कामे टाळावी.
- गृहिणींनी मोकळ्या हवेतील स्वयंपाकघराची दारे खिडक्या उघड्या ठेवाव्या.
 
भिरा पुन्हा तापले 
काही दिवसांपूर्वी भिरा (ता. रायगड) येथील तापमान ४९ अंशावर गेल्याने ते देशात चर्चेत आले होते. तज्ज्ञांनुसार, भिराची भौगोलिक रचना पाहता दोन बाजूंना सह्याद्रीच्या रांगा तर एका बाजूने खजिना नावाचा डोंगर आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे उष्ण वारे वाहताना डोंगरामुळे अडथळा निर्माण होतो. डोंगराचे कातळ तापतात व अतिरिक्त उष्णता निर्माण होते.
 
प्रमुख शहरांतील कमाल तापमान
अकोला - ४४.६ 
नागपूर - ४४.५
अमरावती - ४४ 
गोंदिया - ४३.८
अहमदनगर - ४२.६ 
जळगाव - ४४ 
भिरा - ४२ 
बुलडाणा - ४१ 
पुणे - ४०.२
नाशिक - ४०.१
महाबळेश्वर - ३५
मुंबई - ३४.८

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...