आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमुख शहरांतील पोलिसांच्या कामगिरीचे दरवर्षी मूल्यांकन; उपराजधानीतून प्रारंभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर  -  पोलिस यंत्रणेकडून लोकांच्या अपेक्षा, पोलिसांकडून लोकांना मिळणारी वागणूक, जनमानसातील प्रतिमा, परिणामकारकता या निकषांवर उपराजधानी नागपूर शहराच्या धर्तीवर राज्यातील सर्व प्रमुख शहरांमधील पोलिस दलांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल. लोक पोलिसांच्या कामाबद्दल समाधानी आहेत की नाहीत याची माहिती त्यातून घेतली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली.   
 

पोलिसांच्या कामकाजाचे तटस्थ संस्थेमार्फत केलेले मूल्यांकन नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात जाहीर करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी नागपूर पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. नागपुरात पासपोर्टसाठी पोलिस व्हेरिफिकेशन आता चार ते पाच दिवसांतच मिळणार आहे. मुंबईत ते २४ तासांत मिळत असेल तर नागपुरात का नाही? असे सांगत मुख्यमंत्र्यांनी नागपूर पोलिसांनीही ते २४ तासांतच देण्याची सूचना केली.   
 

कामगिरी सुधारल्याचा दावा  यापूर्वी २०१४ मध्ये तिरपुडे कॉलेज ऑफ सोशल वर्क या संस्थेने नागपुरातील नागरिकांचे सर्वेक्षण करून पोलिसांच्या कामकाजाचे मूल्यांकन जाहीर केले होते. यंदा नागपुरातील साडेपाच हजार नागरिकांशी बोलून हे सर्वेक्षण केले. त्यात  पोलिसांची कामगिरी २०१४ च्या तुलनेत सुधारल्याचा दावा केला आहे. संवाद साधलेल्या नागरिकांपैकी ४७ टक्के (२०१४ मध्ये २० टक्के) लोकांनी कार्यात्मक परिणामकारतेच्या मुद्द्यावर पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांची वर्तणूक सुधारली असल्याचे ४२ टक्के (२०१४ मध्ये १७ टक्के) नागरिकांनी नमूद केले आहे. ४९ टक्के (२०१४ मध्ये १९ टक्के) नागरिकांनी पोलिसांची जनमानसातील प्रतिमा सुधारल्याचे नमूद केले आहे. पोलिसांच्या जागरूकतेबाबत ४५ टक्के (२०१४ मध्ये ३३ टक्के) लोकांनी समाधान व्यक्त केल्याचाही दावा सर्वेक्षणात करण्यात आला.
 
 
‘कानून के हात बहाेत लंबे...’
क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिम प्रणालीत आता आधारमधील माहिती जोडली जाईल.. एखाद्याची माहिती या प्रणालीत टाकली की देशात कुठेही त्या व्यक्तीने गुन्हा केला असेल तर त्याची माहिती लगेच मिळेल. त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘कानून के हात बहोत लंबे होते है,’ अशी परिस्थिती येणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...