आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकर संक्रांतीचे पर्व; लाल, हिरव्या पतंगांनी आज आसमंतही होणार रंगीबेरंगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात मकर संक्रांतीच्या शनिवारी १४ जानेवारीच्या पर्वावर विविधरंगी पतंगांनी आकाशाचेही रंग पालटणार आहेत. शहरातील बच्चे कंपनी आणि पतंग उडवण्याचे शौकीन असलेल्या व्यक्तिंनी शहरातील विविध पतंगांच्या दुकानातून पतंग आणि मांजा खरेदी केला. त्यामुळे संक्रांतीला सकाळपासूनच पतंग उडवून पेच लढवण्यासाठी धावपळ सुरू होणार आहे. 
यंदा मकर संक्रांत शनिवारी आणि त्यालाच लागून सुटीचा दिवस रविवार आल्यामुळे अनेक बालकांनी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर तसेच कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून घरी परतताना पतंगांची खरेदी केली. पेच लढवून दुसऱ्याची पतंग कापण्यात वेगळाच आनंद असतो. त्यामुळे मोकळे मैदान घराच्या छतावर चांगलीच गर्दी राहणार आहे. 

पतंग उडवताना मुलांसोबत वरिष्ठांनी छतावर राहावे, असे आवाहन सामाजिक संस्थांनी केले आहे. कारण दरवर्षी पतंग उडवताना छतावरून पडून जखमी झाल्याच्या घटना घडत असतात. त्याचप्रमाणे वीज वितरण कंपनीनेही पतंग उडवताना जर ती विजेच्या ताराला अडकली तरी कोणताही धोका पत्करून ती काढण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन केले आहे. 

शहरात केवळ मकर संक्रांतीलाच पतंग उडवली जात असल्यामुळे या दोन दिवसांत हजारो विविध आकार रंगांच्या पतंगांची विक्री होत असते. यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. पतंगांसोबतच ५० ते २०० रु. किंमत असलेला मांजाही विकला जातो. मांजा गुंडाळण्यासाठी साध्या तसेच बेअरींग लावलेले चक्रही उपलब्ध आहेत. दोन रुपयांपासून ते ३० रुपयांपर्यंत प्लॅस्टिक आणि कागदी तावाच्या पतंगांनी दुकाने सजली होती. तसेच काहींनी मुद्दाम पेंडाल टाकून दुकाने थाटली होती. 

निवडणुकीची छाप : यंदासंक्रांती नंतर मनपा, जि.प. आणि पंचायत समिती निवडणूक असल्यामुळे विविध राजकीय पक्ष मतदारांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी पतंगांचा वापर करीत आहेत, अशी माहितीही विक्रेत्याने दिली. यासाठी अनेक राजकीय पक्षांनी मोठ्या संख्येत पतंग खरेदी करण्यासाठी आमच्याकडे बोलणी केली. ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करून पतंगांचे वाटप करणार आहेत. त्यामुळे आकाशातही राजकीय रंग दिसतील असे मतही पतंग विक्रेत्याने व्यक्त केले. 

चायनीज मांजा वापरावर कायद्याने घातली बंदी 
चायनीजमांजा हा मनुष्य, प्राणी आणि पक्ष्यांसाठी घातक असल्यामुळे यावर बंदी घालण्यात आली आहे. नायलाॅनपासून निर्मित या मांजाने दुर्घटना घडल्यामुळे आम्ही दोन वर्षे आधीच त्याची विक्री बंद केली आहे. बरेली हा सुतापासून निर्मित मांजा काहीसा महाग असला तरी तोच विकतो आणि पतंगांच्या शौकिनांना खरेदी करण्याचा आग्रह करतो. यामुळे हातही कापत नाहीत. तसेच तो शरीरासाठी ही नुकसानदायक नाही, अशी माहिती शहरातील पतंग विक्रेते नूर मोहंमद दुकानाच्या मालकांनी दिली.