आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: रसायनांचा वापर करून करा गणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - प्रदूषणात भर घालणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींवर बंदी असतानाही त्याचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. या मूर्तींमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यंदा नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाला चालना देण्याचे प्रयत्न चालवले आहेत. पीओपी मूर्तींच्या जैविक विघटनासाठी यंदा प्रथमच वैशिष्ट्यपूर्ण रसायनाच्या वापराला चालना दिली जाणार आहे.   
 
गणेशाेत्सवात गणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक असावे, यासाठी प्रयत्न होत अाहेत. मातीपासून तयार होणाऱ्या मूर्तींचा वापर वाढला असला तरी अद्याप पीओपी मूर्तींचा वापर बऱ्याच प्रमाणात होत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे जैविक विघटन होत नसल्याने त्या प्रदूषणात भर घालतात. पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढून ते पिण्यासाठी अयोग्य ठरते. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाणही कमी होते. मूर्तीतवरील रासायनिक रंगांमुळेही प्रदुषणात भर पडून आरोग्याच्या समस्या उद‌्भवतात. तरीही पीओपीच्या मूर्तींना पूर्णपणे निर्बंध घालणे शक्य होत नसल्याने किमान मूर्तींचे विघटन करून प्रदूषणाला आळा घालण्याचे प्रयत्न ‘नीरी’ने सुरू केले आहेत.   

पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) पीओपी मूर्तींचे विघटन शक्य व्हावे, यासाठी खास अमोनियम बायकार्बोनेट रसायनाचा वापर करण्याचे तंत्र विकसित केले आहे. याच तंत्राचा वापर यंदा निरीच्या एन्व्हायर्नमेंटल व्हायरोलॉजी विभागाकडून केला जाणार आहे. नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार, नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या पुढाकाराने एन्व्हायर्नमेंटल व्हायरोलॉजी विभागाचे प्रमुख असलेले डॉ. कृष्णा खैरनार या प्रकल्पाचे समन्वयक आहेत.   

२० टक्के अमाेनियम बायकार्बाेनेटचा वापर  
डॉ. खैरनार म्हणाले, मूर्ती विसर्जनाच्या पाण्यात २० % अमोनियम बायकार्बोनेट वापर केल्यास पीओपी मूर्तींचे २० तासांत विघटन शक्य आहे. विघटनानंतर त्यातून निघणारे अमोनियम सल्फेटचा वापर खत उपयाेग हाेईल. तर कॅल्शियम कार्बोनेटचा वापर बांधकामाच्या मजबुतीसाठी शक्य आहे. घरगुती मूर्तींचे विसर्जन शक्यतोवर घरीच या रसायनाचा वापर करून करावे.

नागपुरात विसर्जनाची साेय
विसर्जनासाठी नागपुरातील ‘नीरी’च्या परिसरात अमोनियम बायकार्बोनेट रसायनाचे मिश्रण असलेले तीन कुंडे तयार करण्यात येत आहेत. या कुंडांमध्ये किमान पाचशे पीओपी मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. या मूर्तींचा आकार पाच फुटांपेक्षा अधिक नसावा, असेही नीरीने स्पष्ट केले आहे. यावर्षी ही व्यवस्था नीरीचे वैज्ञानिक सांभाळतील. पुढील वर्षी महापालिकेला हा प्रकल्प सोपवण्याची तयारी सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...