आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोमांसच्या संशयावरून भाजप नेत्याला मारहाण, बच्चू कडूंच्या 4 कार्यकर्त्यांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - गोमांस नेत असल्याच्या संशयावरून भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या माजी तालुका उपाध्यक्षास बेदम मारहाण झाल्याचा प्रकार बुधवारी काटोल तालुक्यात घडला. या हल्ल्याचा सूत्रधार आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा काटोल तालुकाध्यक्ष असल्याचे उघडकीस आले असून भाजपने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. भारसिंगी गावात भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचा माजी तालुका उपाध्यक्ष सलीम इस्माईल शाह याच्यावर गोमांस नेत असल्याच्या संशयावरून त्याला चौघा जणांनी लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती.   
 
भाजपकडून निषेध
दरम्यान, सलीम इस्माईल शहा याच्यावरील हल्ल्याचा भाजपने तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. या हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागपूर ग्रामीणचे भाजपाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी केली आहे.
 
कागदपत्र दाखवल्यानंतरही बेदम मारहाण  
 - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांस विक्रेता सलीम इस्माइल शहा हा त्याच्या स्कूटीच्या डीकीतून मीट घेऊन जात होता. दोन राज्यांची सीमा असलेल्या भारसिंगी गावातून तो जात असताना 4 जणांनी त्याला अडवले.
 - डीकीत मांस पाहिल्यानंतर कथित गोरक्षकांनी त्याच्याकडे कागदपत्र मागितले. इस्माईलचे म्हणणे आहे की त्याने बील दाखवले मात्र त्या चार जणांनी हे बनावट कागदपत्र असल्याचे सांगत फेकून दिले. 
 - कथित गोरक्षकांनी इस्माईल याला शिवीगाळ आणि मारहाण सुरु केली. लाथा-बुक्यांनी मारहाण केली. खाली पडलेल्या इस्माइल यांच्या अंगावर त्यांची स्कूटी ढकलून दिली.
 
 आमदार म्हणाले, हल्लेखोर माझे समर्थक
 - विदर्भातील अंचलपूरचे अपक्ष आमदार ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू यांनी कथित गोरक्षक हे आपले समर्थक असल्याचे म्हटले आहे. 
 - बच्चू कडू म्हणाले, 'हल्ला करणारे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत. ते नेहमी चांगले-चांगले उपक्रम करत असतात. त्यांनी त्या व्यक्तीकडे बीफ असल्याचे पाहिले आणि त्याला अडवले. जर त्यांनी कायदा मोडला असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. ते नेहमी चांगले काम करत असतात त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही.'

 मोदी म्हणाले होते - हे कसे गोरक्षक ?
 - गोरक्षेच्या नावाखाली देशभरात सुरु असलेला हिंसाचार दुःखद असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. गुजरातमधील साबरमती आश्रमात मोदींनी गोरक्षणाच्या नावाखाली मारहाण करणारे गोरक्षक असू शकत नाही असे म्हटले होते. ते म्हणाले होते, 'गायीच्या नावावर एखाद्याल मारण्याचा आम्हाला कोणी अधिकार दिला आहे? ही कसली गो-भक्ती? हा गांधीजी आणि विनोबांचा मार्ग असू शकत नाही. आम्ही स्वतःवरील ताबा कसा काय सुटू देतो?  गायीच्या नावावर माणसाला कसे काय मरू शकतो?'  
बातम्या आणखी आहेत...