आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुतांश महाविद्यालयांनी केले वैकल्पिक विषय अनिवार्य!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये वैकल्पिक विषय अनिवार्य करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय अभ्यासता यावे म्हणून विद्यापीठाने विषय निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे हे स्वातंत्र्य हिरावले आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत कला शाखेतील विविध विषय विद्यार्थी अभ्यासतात. इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, तत्वज्ञान, साहित्य यासारख्या आवडीच्या विषयाच्या निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना आहे.

इंग्रजी मराठी या दोन भाषांचा ‘अनिवार्य विषय’ म्हणून तर इतर कोणतेही तीन विषय ‘वैकल्पिक विषय’ निवडून विद्यार्थी कला शाखेतील परीक्षा देऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारीच्या दृष्टिने आवडीने तीन विषयांची निवड करता येते. मात्र अनेक महाविद्यालयांनी वैकल्पिक विषयात अंतर्गत गट निर्माण करुन विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर अंकुश ठेवला आहे. कला शाखेतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमधून उज्ज्वल भविष्य निर्माण होण्याचे स्वप्न पाहत असतात. त्यासाठी ज्या विषयामध्ये सुरुवातीपासून आवड आहे, असे ऐच्छिक विषय निवडून त्यात आपले करीअर घडवण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतात. आवडीचे विषय अभ्यासून लवकरात लवकर नोकरी मिळविण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न आणि प्रयत्न असतात. मात्र काही महाविद्यालयांनी विद्यापीठाची कोणतीही पूर्वपरवानगी घेता वैकल्पिक विषय अनिवार्य केले आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे काही महाविद्यालयांनी स्वत:च्या माहिती पुस्तकात विषयांचे गट छापून विद्यार्थ्यांना या गटातील विषय निवडण्याचे बंधन घातले आहे. तरीसुद्धा आजपर्यंत विद्यापीठाकडून या बाबीची दखल घेतली नसल्याचे निदर्शनास येत आहे.

महाविद्यालयांनी राज्यशास्त्र किंवा इतिहास, इतिहास किंवा भूगोल, समाजशास्त्र किंवा अर्थशास्त्र, तत्वज्ञान किंवा साहित्य असे अंतर्गत गट निर्माण केले आहे. त्यामुळे एका गटातील दोन्ही विषय विद्यार्थी इच्छा असूनही घेऊ शकणार नाही. ही बाब विद्यार्थ्यांच्या अभ्यास विषय निवडीच्या मुलभूत स्वातंत्र्यावर अंकुश आणणारी आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना माहिती पुस्तके मागवून संबंधित महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
विद्यापीठाकडून विषय निहाय मान्यता
शासन निर्णयानुसार संलग्नित महाविद्यालयांकडून प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने विषय निहाय मान्यता विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. महाविद्यालयांमध्ये स्थानिक शैक्षणिक सोयी सुविधेनुसार प्राचार्यांकडून अशाप्रकारे गट निर्माण करण्यात आले असावे. अपरिहार्यता म्हणून स्थानिक प्राचार्यांना ही कृती करणे भाग पडले असावे. मात्र विद्यापीठाकडून अशा स्वरूपाच्या सूचना नाहीत. डॉ.अजय देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
बातम्या आणखी आहेत...