आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा नेतृत्वाने न्याय देण्याऐवजी समाजाचा वापर केला : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नरेंद्र पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मराठा नेतृत्वाने समाजाला न्याय देण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. फक्त निवडणुकांसाठी त्यांचा वापर करून घेतला, असा घरचा आहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरेंद्र पाटील यांनी विधान परिषदेत बुधवारी विरोधकांना दिला. याचवेळी त्यांनी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नियुक्त केलेल्या राणे समितीच्या अहवालाचाही भंडाफोड केला. राणे समितीचा अहवाल लोकसभा निवडणुकीपूर्वीच तयार झाला होता. पण प्रसिद्ध करण्यात आला नाही. लोकसभेत पराभव झाल्यानंतर विधानसभेत यश मिळावे म्हणून अहवाल घाईघाईने प्रसिद्ध करण्यात आला, असे वास्तव पाटील यांनी उघड केले.

मराठा आरक्षणावरील चर्चेवेळी पाटील यांनी ३५ मिनिटांच्या आपल्या घणाघाती भाषणात मराठा नेतृत्वाच्या नाकर्तेपणावर बोट ठेवले. राज्यकर्ते कोणीही असोत, मराठा समाजाला नेहमीच चाॅकलेट दाखवून रडायला लावले आहे. मराठा आरक्षणासाठी पाटील यांनी सत्ताधाऱ्यांऐवजी आपल्या विरोधी पक्षांनाच आराेपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने सभागृह थक्क झाले. मराठा नेतृत्वाने पंधरा वर्षांत फक्त जातीय राजकारण केले. याचबरोबर मागासवर्गीय आयोगही मराठा समाजाला आरक्षण न देण्यासाठी कारणीभूत आहे. आयोगाने इतर समाजाला लगेच आरक्षण दिले. मात्र, त्यांना मराठा समाजाचे मागासलेपण दिसले नाही. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला पाहिजे, असेही पाटील यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांनी जाहीरपणे ठणकावले. त्यामुळे सभागृहात अवाक झाले.
गैरहजर मेटेंना विरोधकांनी रोखले
पाटील यांनी अर्धा तास तडाखेबंद भाषण केल्यानंतर तालिका सभापती अनंत गाडगीळ यांनी चर्चेसाठी विनायक मेटेंचे नाव पुकारले, पण मेटेंच्या नावाला शेकापच्या जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. मेेटे या चर्चेवेळी यापूर्वी गैरहजर असल्याने त्यांच्याऐवजी इतरांना बोलण्याची संधी मिळाली पाहिजे, असे पाटील यांनी नमूद केले. पाटील यांच्या म्हणण्याला भाई जगताप तसेच हेमंत पाटील यांंनी पाठिंबा दिला, तर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर मेटेंच्या मागे उभे राहिले. यामुळे झालेल्या गदारोळात सभागृह दोनवेळा तहकूब करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...