आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखो मराठ्यांचा नि:शब्दहुंकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा, अॅट्राॅसिटी कायद्यात सुधारणा आणि मराठा समाजाला आरक्षण या इतर प्रमुख मागण्यांसाठी शहराच्या इतिहासात प्रथमच शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या विशाल मराठा क्रांती मूक मोर्च्यात लाखो मराठे एकवटल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले. शांती, शिस्त स्वच्छता हे या मोर्चाचे मुख्य वैशिष्ट्ये ठरले. लाखोंची गर्दी असूनही आयोजकांनी ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत समाजबांधवांनी कुठेही घोषणा दिल्या नाहीत.
नेहरू मैदान ते गर्ल्स हायस्कूल चौक असा सुमारे अडीच की.मी.लांब हा मोर्चा होता. शहरातील मुख्य चौकापैकी एक गर्ल्स हायस्कूल चौकात चारही बाजूने मोर्चेकरी येऊन मिळाल्यामुळे मोर्चाचे भव्य स्वरूप प्रकट झाले. शहराच्या इतिहासातील हा सर्वात विशाल मोर्चा ठरला आहे.
पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार अडीच ते तीन लाख तर आयोजकांनी दिलेल्या आकडेवारीनुसार मराठा क्रांती मूक मोर्च्यात आठ ते लाख लोक सहभागी झाल्याचा अंदाज आहे.
नेहरू मैदान येथे जिजाऊ वंदना उरी येथील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना तसेच कोपर्डी घटनेतील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर युवती महिलांनी आघाडीला राहून मोर्चाचे नेतृत्व केले. या मैदानावर प्रामुख्याने महिला एकवट्याला होत्या. तर पुरुषांना पुढे चौकात थांबण्यास सांगण्यात आले होते. प्रत्येकी पाचच्या रांगेत हा मोर्चा प्रारंभी पुढे सरकला. त्यानंतर हळूहळू ही रांग वाढत गेली. आघाडीला महिला युवती, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, त्यानंतर पुरुष युवक आणि सर्वात शेवटी सर्व पक्षातील मराठा नेते अशी या मोर्चाची रचना होती.
मोर्चाला मार्ग दाखवण्यासोबतच नियंत्रित ठेवण्याची स्वयंसेवकांची जबाबदारी होती. यात ताळमेळाअभावी प्रारंभी काहीसा गोंधळ उडाला. नंतर मात्र सर्व बाबी व्यवस्थित होत राहिल्या. चारही बाजूंच्या रस्त्यांनी मोर्चात लोक येऊन मिळत होते. तसा मोर्चाचा आकार वाढत होता. मोर्चा पुढे सरकत असताना काळ्या केशरी झेंड्यांनी रस्ते व्यापले होते. प्रचंड उकाडा असल्यामुळे मार्गात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. रस्त्यात कचरा होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. काळ्या गणवेशातील स्वयंसेवक कुठेही कचरा दिसला की तो लगेच उचलून घेत होते. त्यामुळे शिस्तीत गोंधळ घालताही मोर्चा निघू शकतो, याचा प्रथमच शहरवासीयांना प्रत्यय आला. मार्चाच्या मार्गावरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. अनेक दुकांनांपुढे पिण्याचे पाणी ठेवण्यात आले होते. इर्विन चौकात जिल्हा सामान्य रुग्णालय असल्यामुळे तेथे शांतता नांदेल याची काळजी घेण्यात आली. तसेच रुग्णवाहिकांनाही कोणत्याही अडथळ्याशिवाय वाट करून देण्यात आली. गर्ल्स हायस्कूल चाैकातून दुपारी एक वाजताच्या सुमारास लाखो मराठ्यांचा क्रांती मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आल्यानंतर मोर्चा अडवण्यात आला. केवळ चार मुलींना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी पुढे पाठवण्यात आले. नेहरू मैदान येथून ११.३० च्या सुमारास निघालेल्या मोर्चाची राष्ट्रगीताद्वारे दु. १.४५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सांगता झाली.

वाहनतळांचेअंतर लांब, मोर्चा निघण्यास उशीर : वाहनतळांचीव्यवस्था नेहरू मैदान या मुख्य स्थळापासून बरीच लांब करण्यात आली होती. बरे सर्व मार्ग बंद करण्यात आल्यामुळे तसेच आॅटो, शहर बसही बंद असल्यामुळे मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या लाेकांपुढे पायी येण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मोर्चा निर्धारित वेळेत ११ वाजता निघू शकला नाही. बाहेर गावाहून आलेल्यांना सुमारे तीन ते चार कि.मी.अंतरावर असलेल्या वाहनतळांपासून पायीच मोर्च्याच्या ठिकाणी यावे लागले.

मद्यविक्री बार बंद : मोर्चाच्यािनमित्ताने शहरातील मद्यविक्री बार बंद ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे ज्या मार्गावरून मोर्चा पुढे सरकणार होता त्या मार्गावरील दुकाने बंद होती.
उन्हाचाज्येष्ठांना त्रास : शहरातऐन मोर्चाच्या वेळी चांगलाच उकाडा असल्यामुळे युवती महिलांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना तो असह्य झाला. काही युवती ज्येष्ठ महिला बेशुद्ध पडल्या. संपूर्ण मोर्चात भोवळ येऊन सहा ते सात जण बेशुद्ध पडले. त्यांना त्वरित रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. नेहरू मैदानात गर्दी वाढल्याने आयोजकांनी पुरुषांना बाहेर चौकात थांबवण्याची विनंती केली. त्यामुळे लगेच गर्दी नियंत्रणात आली. मोर्च्याच्या सुरक्षेसाठी मार्गारील मुख्य इमारतींवर पोलिस तैनात करण्यात आले होते. बाॅम्बशोध पथकही तैनात होते.

मोर्चात सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी सहभाग घेतला. यात पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री डाॅ. रणजीत पाटील, शिवसेनेचे संजय बंड, प्रा. शरद सूर्यवंशी, सुरेखा लुंगारे, डाॅ. सोनाली देशमुख, प्रकाश भारसाकळे, संजय खाेडके, सुलभा खोडके, नितीन मोहोड, आमदार डाॅ. अनिल बोंडे आदींचा समावेश होता. मुस्लिम बांधवांनी मोर्चात सहभागी मराठ्यांना पाणी पाऊच वाटून एकतेचा परिचय दिला. मराठा मोर्चाच्या निमित्ताने बाजार समिती बंद राहिल्यामुळे शहरात आज भाजीपाला फळे पोहोचलीच नाहीत. नित्याचे व्यवहार आज बंद राहिले. त्यामुळे गल्ल्यांमध्ये फिरून भाजीपाला विकणारेही आज फिरकले नाहीत. त्यामुळे सर्वसमान्यांची गैरसोय झाली.

काळ्या पोशाखातील मुलींनी दिले निवेदन
कोणत्याही नेत्यांनी पुढे येता समाजातील लहान मुलींना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवले. काळ्या पोशाखातील या मुलींकडून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी स्वीकारले. निवेदन देणाऱ्या मुलींमध्ये अमुल्या कृष्णराव सोळंके, जानकी नितीन यावलीकर, अनुष्का संजय रडके, पूनम रामकृष्ण चिखलकर यांचा समावेश होता. निवेदन देण्याआधी या मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना जय हिंद म्हणत सॅल्यूट ठोकला. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालविण्यात यावे, अॅट्राॅसिटी कायद्यात सुधारणा करावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी मोहन पातूरकर, उपजिल्हाधिकारी महसूल प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...