आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चाला भाजपची सहानुभूती; मुंबई, नाशिकहून खास रेल्वे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - आरक्षणासाठी मराठा समाजाची लढाई आता निर्णायक टप्प्यात असून १४ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडकणारा मराठा क्रांती मोर्चा ताब्यात घेण्याचे भाजपकडून डावपेच आखण्यात आले आहेत. याचाच भाग म्हणून दोन्ही सभागृहांत मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी फडणवीस सरकार कसे प्रयत्न करत आहे हे दाखवले जात आहेच; पण रस्त्यावरील मूकमोर्चालाही भाजपशी कशी सहानुभूती आहे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.

फडणवीस यांच्या निकटवर्तीय आशिष शेलार यांनी विधानसभेत, तर विधान परिषदेत प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणाविषयी प्रस्ताव मांडत सहानुभूतीची पहिली खेळी केली. शेलार यांच्या विनंतीवरून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबई व नाशिकवरून मराठा मोर्चासाठी येणाऱ्यांना खास रेल्वे गाडीची व्यवस्था केली आहे.

राज्यात आतापर्यंत ४० पेक्षा अधिक मराठा क्रांती माेर्चे निघाले. १४ डिसेंबरला अधिवेशनावर भव्य मोर्चा काढून सरकारला शेवटचा इशारा देण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे. न्यायालयाच्या पार्श्वभूमीवर मराठ्यांच्या बाजूने आरक्षणाचा कौल हाती येण्यासाठी फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मात्र, फडणवीस सरकार मराठा समाजाच्या बाजूने नुसते बोलते की काही ठोस पावले उचलणार आहे याचीही यानिमित्ताने चाचपणी करून घेण्यात येणार आहे. नागपूरमधील मोर्चाने सरकारकडून काही पावले उचलली गेली नाहीत तर मग मुंबईत राज्यभरातून मराठा समाज रस्त्यावर उतरवून हल्लाबोल करण्याचा याआधीच निर्णय झाला आहे. महत्त्वाच्या विषयावरील चर्चेसाठी बहुतांशी विरोधकांकडून प्रस्ताव मांडला जातो. मात्र, मराठा समाज आरक्षणावर विधानसभेत प्रस्ताव मांडताना आशिष शेलार यांनी केलेला युक्तिवाद भाजपला मराठ्यांचा किती पुळका आहे हे दाखवून देणारा होता.
स्वत: वकील असलेले शेलारही मराठा समाजाचे असल्याने त्यांच्या भाषणातून समाजाविषयी कळवळा दिसून आला. त्यांचा युक्तिवाद प्रभावी झाल्याने सत्ताधाऱ्यांनी मान्य केलेच, पण विरोधकांनीही त्यांचे कौतुक केले. हीच गोष्ट विधान परिषदेतही घडली ती दरेकरांच्या भाषणाने. मनसेचे इंजिन सोडून भाजपच्या गाडीत बसलेेले दरेकर हे फडणवीसांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. आपल्या नेत्यांची भूमिका मांडण्यात यशस्वी ठरल्याने भाजप दोन्ही सभागृहांतील चर्चेत पास झाल्याचे चित्र दिसून आले.

रस्त्यावरच्या लढाईची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी शेलार यांच्याकडेच सोपवलेली असल्याने अधिवेशनाच्या गेल्या आठवड्यात शेलारांनी राज्यातील भाजपच्या सर्व मराठा नेत्यांशी मोर्चात सहभागी हाेण्याविषयी विस्तृत चर्चा केली. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथून पक्षांचे मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागपूरमध्ये उतरतील याविषयी सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या प्रवासाची, जेवणाची तसेच राहण्याची उत्तम व्यवस्था करण्याच्या शेलारांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्यांनी प्रवास करणे काहीसे अडचणीचे ठरू शकेल म्हणून मुंबई व नाशिकवरून खास रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे.

भाजपच्या आशिष देशमुखांची बैठक निष्फळ
मराठा आमदारांना एकत्र करण्याची जबाबदारी फडणवीस यांनी काटोलचे आमदार आशिष देशमुख यांच्याकडे सोपवली होती. मात्र, बहुतांश मराठा आमदारांनी पाठ फिरवल्याने देशमुखांची बैठक निष्फळ झाली. यामुळे फडणवीस नाराज झाले असल्याचे समजते. मराठा मोर्चावर फडणवीस बारीक लक्ष ठेवून असून शेलार व दरेकर यांच्यासह रणजित पाटीलांनाही हा मोर्चा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले आहे. पोलिस व प्रशासनाही मोर्चेकऱ्यांना मदत होईल, अशी भूमिका घेण्याच्या सूचना दिल्याचे कळते. राज्यात ३५ टक्के समाज आणि २८८ पैकी १४० आमदार हे मराठा असल्याने या समाजाला तसेच त्यांच्या लोकप्रतिनिधींना नाराज करून चालणार नसल्याची चांगलीच कल्पना फडणवीस यांना आहे.

कुणबी मराठ्यांच्या बाजूने
विदर्भात कुणबी समाज मोठ्या संख्येने असून मराठे फक्त १५ टक्क्यांच्या जवळपास आहेत. यामुळे या भागात कुणबी समाजाचे मोठे महत्त्व आहे. विशेष म्हणजे विदर्भासह राज्यातील काही भागांत मराठे हे कुणबी म्हणूनही ओळखले जातात. कुणबी समाजातील काही जणांना ओबीसीमधून आरक्षणही मिळाले आहे. मात्र, ही संख्या अगदी मोजकी असून मोठ्या संख्येने कुणबी अजूनही आरक्षणापासून वंचित आहेत. यामुळे विदर्भात अारक्षणाच्या बाजूने कुणबी समाजाचा मराठ्यांना नेहमीच पाठिंबा लाभला असल्याने येथील मोर्चाला आम्ही ‘सकल कुणबी मराठा समाज क्रांती मोर्चा’ असे नाव दिले आहे.
राजेंद्र कोंढरे, मराठा मोर्चा नेते
बातम्या आणखी आहेत...