आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी ही पदवीपर्यंत सक्तीची, विज्ञानाची भाषा व्हायला हवी; साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांचेे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘महाराष्ट्रात शिकणाऱ्या सर्व इतर भाषक विद्यार्थ्यांनाही पहिली ते स्नातक पदवीपर्यंत मराठी भाषा ऐच्छिक विषय न ठेवता अनिवार्य केला पाहिजे, तरच महाराष्ट्रात मराठी भाषा टिकून राहील. तसेच मराठी ही विज्ञानाची भाषा व्हायला हवी, तर पालक अापल्या मुलांना मराठी शाळेत पाठवतील’, असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. अक्षयकुमार काळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना मांडले. साेमवारी साजऱ्या हाेणाऱ्या  ‘मराठी राजभाषा दिना’च्या पार्श्वभूमीवर डाॅ. काळे यांच्याशी साधलेला संवाद..  
 
{ ‘जागतिक मराठी दिन’ वा ‘मराठी राजभाषादिनी’च मराठीविषयी चिंता व्यक्त होते. त्यानंतर काहीच होत नाही, असे का?  
डाॅ.काळे : मराठी माणसांनी ही प्रासंगिकता साेडली पाहिजे, असे मला वाटते. केवळ प्रासंगिक चिंता व्यक्त करून काहीच साध्य होत नाही. त्यासाठी मराठीजनांनी एकत्र येऊन संघर्ष करायला हवा.  
 
{ मराठी भाषा अनिवार्य करायला हवी असे तुम्ही म्हणालात. त्याने फरक पडेल?  
डाॅ.काळे : निश्चितच पडेल. आज इतर भाषकांसाठी मराठी हा ऐच्छिक विषय असल्याने ते हा विषय शिकत नाही. मराठीशी त्यांचा संबंध न आल्यामुळे त्यांना या भाषेविषयी आस्था राहत नाही. म्हणून ते मराठी बोलतही नाही. मराठी भाषा अनिवार्य केल्यास ते निदान ही भाषा शिकतील. केवळ अनिवार्य करून चालणार नाही तर मराठीत प्रावीण्य मिळविणाऱ्याच्या गुणांचे आधिक्य टक्केवारीत जाेडायला हवे. असे केल्यास मराठी वाढेल.  
 
{ मराठी नाटकांची नावेही आजकाल इंग्रजी असतात...  
डाॅ.काळे : व्यावसायिक रंगभूमीवर व्यवसायाचा प्रश्न असतो. लोकांना अाकर्षित करण्यासाठी ते इंग्रजी नावे ठेवतात. व्यावसायिक रंगभूमीवाल्यांना मराठीशी काही देणेघेणे नसते. त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण नाही. त्यांना आपण काही सांगू शकत नाही. फार झाले तर प्रबोधन व समुपदेशन करू शकतो.    
 
{ मराठीत अनेक इंग्रजी शब्द आहे. त्याचप्रमाणे अरबी, उर्दू, फारसी व हिंदीतील अनेक शब्द मराठी माणूस बोलण्यात वापरतो. यामुळे मराठी ‘दीन’ होत आहे का?   
डाॅ.काळे : अजिबात नाही. इतर भाषांतून सहजपणे मराठीत येणारे शब्द स्वीकारायला काहीच हरकत नाही. त्यामुळे मराठीची शब्द संपत्ती वाढून ती अधिक समृद्ध होते. त्यामुळे मराठीचा अजिबात ऱ्हास वगैरे होत नाही. काही उच्चभ्रू लोक चुकीचे मराठी बोलतात. त्यामुळे मात्र मातृभाषेचे नुकसान हाेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...