आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायमराठीची ‘अक्षय’ चिंता...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज इंग्रजीचे स्तोम माजवून मूठभर लोक समाजावर सत्ता गाजवत आहेत. पण या सर्व गोष्टींसाठी केवळ राज्यकर्ते, राजकारणी आणि शिक्षणसम्राटांनाच जबाबदार ठरवले म्हणजे आपल्यावरची जबाबदारी झटकल्यासारखे होईल. 
 
‘तुमच्या दु:खाला तुम्ही स्वत:च कारण असता’, अशा आशयाचे एक इंग्रजी वचन आहे. खरे म्हणजे असे वचन वा म्हण जगातील कोणत्याही भाषेत असू शकते. पण इंग्रजी भाषेत आहे म्हटले की, लेखाचे व लेखकाचेही ‘इम्प्रेशन’ एकदम वाढते; इतका आमच्यावर इंग्रजीचा प्रभाव आहे. मुंबईतून मराठी माणूस आणि महाराष्ट्रातून मराठी शाळा व भाषा हद्दपार होत चालली आहे. अर्थात मराठीची अचानक चिंता करण्यास कारण ठरले ते अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांनी मायमराठीविषयी व्यक्त केलेली चिंता हे होय. 
हा लेख तुम्ही वाचत असाल तेव्हा मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजलेले असेल. डोंबिवली येथे आयोजित संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. अक्षयकुमार काळे यांनी काळाचे आणि वास्तवाचे भान राखत ‘व्यावसायिक शिक्षणसम्राटांच्या दारात मराठी शाळा भिकारणीसारखी आसवे गाळीत बसली आहे’ अशी वास्तववादी खंत व्यक्त केली आहे. वास्तवाला भिडण्यात मराठी लेखक कमी पडताना दिसतात, असा एक मोघम आरोप नेहमी करण्यात येतो. पण संमेलनाध्यक्षांनी त्यांच्या भाषणातून ते वास्तवाला भिडतात हे दाखवून दिले आहे. 

गेल्या शतकात ग्वाल्हेरपासून तंजावरपर्यत मराठी भाषा प्रचलित होती. नाना फडणवीस हैदर व टिपूला मराठीतून पत्रे लिहीत व महादजी शिंद्यांचा रजपूत राजांशी मराठीत व्यवहार होई, असे इतिहास सांगतो. ग्वाल्हेरपासून तंजावरपर्यंत खासगी व सार्वजनिक दफ्तरे मोडीत व मराठीत लिहिली जात. मग असे काय झाले की, महाराष्ट्रातून एकदम मराठी भाषाच मोडीत निघावी? आज महाराष्ट्राबाहेर आणि महाराष्ट्रातही मराठीचा अतोनात संकोच होत असल्याचेही संकोचाने सांगितले जाते. मराठीविषयीची ही चिंता खूप जुनी आहे. १९२६ मध्ये पुण्याच्या शारदोपासक संमेलनाच्या पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना इतिहासकार राजवाडे यांनीही माय मराठीविषयी चिंता व्यक्त केली होती. “मराठीची तोंडदाबणी...अशीच आणीक पाच-पंचवीस वर्षे होत गेल्यास, लवकरच सर्व महाराष्ट्र इंग्रजी भाषा, शुद्ध किंवा अपभ्रष्ट अशी, हांगकांगमधील पीज्यन इंग्लिशप्रमाणे, बोलू लागेल असा निश्चित अंदाज दिसतो,” असा धोका राजवाडेंनी ९१ वर्षांपूर्वी व्यक्त केला होता. म्हणजे १९५०-५१ पर्यंत मराठी माणूस अपभ्रष्ट  मराठी बोलू लागेल, असे त्यांचे म्हणणे होते; परंतु तसे झालेले दिसत नाही. म्हणजे मराठी अजूनही लिहिली व बोलली जात आहे. नवनवीन लेखक तयार होत आहेत. मराठी भाषेची साहित्य संमेलनांसह इतरही संमेलने दणक्यात होत आहेत. या संमेलनांचे अध्यक्ष मराठीतूनच मराठीविषयीची चिंता व्यक्त करत आहेत. 

श्रीमंतीचा आब टिकवण्यासाठी कर्ज काढून बडेजाव करणाऱ्या निर्धन इजारदारासारखी मराठीची स्थिती आहे.  आज इंग्रजीचे स्तोम माजवून मूठभर लोक समाजावर सत्ता गाजवत आहेत. पण या सर्व गोष्टींसाठी केवळ राज्यकर्ते, राजकारणी आणि शिक्षणसम्राटांनाच जबाबदार ठरवले म्हणजे आपल्यावरची जबाबदारी झटकल्यासारखे होईल. प्रत्येक गोष्टीचे खापर इतरांवर फोडून नेहमीच मोकळे होणे कधी तरी अंगाशी येते. त्यापेक्षा आत्मपरीक्षण करून उपाय करणे हितकारक ठरते. 

आपली भाषा अधिक वर्धिष्णु करायची असेल तर भाषेविषयीचा न्यूनगंड प्रथम सोडला पाहिजे. स्वभाषेबद्दलची लाज आणि न्यूनगंड मराठी माणसाइतका क्वचितच इतर कोणाला वाटत असेल. मराठी भाषिक माणूस आपल्याच माणसांत आणि शहरांत मराठीतून बोलायला कचरतात. स्वभाषेचा अभिमान गुजराथी व पंजाब्यांकडून शिकायला पाहिजे. गुजराथी माणसाची घरची, दारची, बाजाराची भाषा गुजराथीच राहते. कुठेही भेटले तरी दोन गुजराथी माणसे बिनधास्त गुजराथीच बोलतात. पंजाब्यांचे भाषा प्रेम आणि आत्मविश्वासाबद्दल वेगळे सांगायला नको. बिनधास्त मराठी बोलायला लागा. म्हणजे मग मराठीची ‘अक्षय’ चिंता करण्याची वेळ येणार नाही.
बातम्या आणखी आहेत...