आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तावडे काका, हजार रुपये द्या; शाळाबाह्य मुलांचा मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर । शिक्षण हक्क कायदा मंजूर होऊन ६ वर्षे उलटून गेली तरीसुद्धा भटक्या विमुक्तांची मुले अजूनही शाळेबाहेर आहेत. या शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी संघर्ष वाहिनी या संस्थेच्या वतीने विधानसभेवर भटक्या विमुक्तांच्या शाळाबाह्य मुलांचा मोर्चा काढण्यात आला. यात १०० पेक्षा जास्त मुले व १००० भटके पालक सहभागी झाले होते.
अनेक शाळांत या मुलांची नावे पटावर घेतलेली असून मुले मात्र शाळेत हजर नाहीत. मुलांचे स्थलांतर झाले तरीसुद्धा मुलांची हजेरी रोज मांडली जाते. त्यामुळे मुले शाळाबाह्य दिसत नाहीत, याकडेही मोर्चात लक्ष वेधण्यात आले. शाळाबाह्य मुलगा दिसला तर १००० रुपये देण्याची घोषणा विनोद तावडे यांनी केली होती. त्यावर मुलांनी “तावडे काका, १००० रुपये द्या ‘अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर मोर्चातील निरक्षर मुलांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांची वेदना मांडली. मोर्चा काढण्यापूर्वी विदर्भात अनेक पालांवर जाऊन भटक्यांची शाळाबाह्य मुले शोधण्यात आली व प्रशासनाला त्याची माहिती सादर केली. या मोर्चात पारंपरिक खेळ करत मुलांनी सहभाग घेतला.
बातम्या आणखी आहेत...