आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस उपायुक्त मामा, महापौर यजमान; सदिच्छांच्या वर्षावात पार पडला अनाथ सोनलचा विवाह सोहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- सोनल आणि सुनील (बदललेली नावे) या दोघांचा विवाह सोहळा रविवारी सायंकाळी थाटात पार पडला. या विवाह साेहळ्यात वऱ्हाडी मंडळींच्या स्वागतासाठी यजमान म्हणून प्रतिष्ठित आणि दिग्गज मंडळी होती. याच प्रतिष्ठितांपैकी कुणी सोनलचे मामा-मामी झाले, तर कुणी पालक बनून तिचे कन्यादान केले. वऱ्हाडींच्या स्वागतालाही हाच सगळा ताफा होता. कारण... सोनल अनाथ होती.

नागपूरच्या महापौर नंदा जिचकार व त्यांचे पती आरटीओ शरद जिचकार यांनी वऱ्हाडींचे आपलेपणाने स्वागत केले. मुंबईचे पोलिस उपायुक्त मनोजकुमार शर्मा व त्यांच्या पत्नी श्रद्धा शर्मा मुलीचे मामा-मामी झाले होते. तर, एमएमआरडीएचे संचालक प्रवीण दराडे व मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त उपायुक्त पल्लवी दराडे यांनी तिचे कन्यादान केले. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याला बीएमसीचे अतिरिक्त उपायुक्त संजय देशमुख यांचीही उपस्थिती होती. हे सर्व आयएएस, आयपीएस अधिकारी आणि महापौर अशा व्हीआयपींच्या उपस्थितीत पार पडलेला हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला. सोनल ही एका देहविक्रय करणाऱ्या महिलेची मुलगी. तर तिचा पती सुनील एका प्रतिष्ठित घरातील मुलगा आहे. आई-वडील, दोन भाऊ असलेल्या सुनीलने समाजाच्या कुप्रथा आणि अडसर बाजूला सारून अनाथांना आधार देणारा आदर्श घालून देणारी नवी वाट रूजवली आणि सोनलशी विवाह केला.

६ वर्षांची असताना अनाथाश्रमात
सहा वर्षांची असताना सोनल विमलाश्रमात आली. तिथून आश्रमाचे प्रमुखच तिचे आई-वडील झाले. तळहाताच्या फोडासारखे जपत त्यांनी सोनलला लहानाचे मोठे केले. बीए बीएड करून सोनल शहरातीलच एका शाळेवर शिक्षिका म्हणून लागली. सोनल लग्नाची झाल्यावर वर संशोधन सुरू झाले. एका मध्यस्थाने सुनीलचे स्थळ अाणले. पाहण्याचा कार्यक्रम झाला. रीतसर पसंती आली. कोणत्याही मागणीविना वरपक्षाने सोनलला स्वीकारले. रविवारी मानेवाडा येथे मंगल सोहळा पार पडला. संपूर्ण विमलाश्रम परिवार विवाहास उपस्थित होता.
बातम्या आणखी आहेत...