आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दरोडेखोरांच्या टोळींविरुद्ध मोक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कोणताही गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराला अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ट करणे हे पोलिसांचे कर्तव्यच आहे. मात्र, गुन्हेगारीवर कायमस्वरूपी अंकुश ठेवायचा असेल, तर गुन्हेगारांच्या नांग्या ठेचणे आवश्यक आहे. याच उद्देशाने जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी अधीक्षकपदाचा प्रभार स्वीकारल्यापासून मागील सहा महिन्यांत प्रमुख तीन कारवाई केल्या आहेत. जबरी चोऱ्या, दरोडे टाकणाऱ्या टोळीविरुद्ध मोक्का, तडीपारीच्या कारवाईसह अमित बटाऊवाले हत्याकांडातील चार गुन्हेगारांना हायकाेर्टाने मंजूर केलेला जामीन रद्द करावा, यासाठी ग्रामीण पोलिस सुप्रीम कोर्टात जाणार आहे. हे तिन्ही निर्णय ग्रामीण पोलिस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आले आहेत. ग्रामीण पोलिसांचे कार्यक्षेत्रात ३१ पोलिस ठाणे आहेत. गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांकडून पकडण्यात येते, ही काही नवीन प्रक्रिया नाही. मात्र, वारंवार गुन्हे करून सर्वसामान्यांना त्रस्त करून सोडणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असायलाच पाहिजे. हा वचक बसवण्यासाठी पोलिसांकडे अधिकार आहेत, त्या अधिकारांचा वापर करून पोलिस उपद्रवी गुन्हेगारांच्या मुसक्या आवरू शकतात. मात्र, कोणत्या वेळी कोणत्या अधिकार शस्त्राचा वापर करून गुन्हेगारांच्या नांग्या दाबाव्यात, हे त्या अधिकाऱ्याने ठरवायचे असते. अमरावती ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत या वर्षी घडलेल्या गुन्ह्यांसारखे गंभीर गुन्हे यापूर्वीसुद्धा घडले, ते गुन्हेगारसुद्धा पोलिसांनी अटक केलेच आहेत. मात्र, गंभीर गुन्हे करणाऱ्यांचे पोलिस काय करू शकतात, हे मात्र केवळ पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनीच दाखवून दिले आहे.
जामीन रद्द करण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालय
अमित बटाऊवाले खून प्रकरणात आरोप ठेवून पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी चार जणांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. ग्रामीण पोलिसांनी या चार आरोपींच्या जामीन निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. हीसुद्धा ग्रामीण पोलिसांच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.

वारंवार घरफोडी, चोरी, हाणामारी करणाऱ्या दोन टोळींना पोलिस अधीक्षकांनी तडीपार केले आहे. यामध्ये एक धामणगाव रेल्वे परिसरातील, तर दुसरी दर्यापूर, अासेगाव भागातील टोळीचा समावेश आहे. या दोन्ही टोळींना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. ही कारवाई नोव्हेंबर डिसेंबर २०१५ मध्ये झाली. विशेष म्हणजे तडीपारीची ही ग्रामीण पोलिसांची पहिलीच कारवाई होती.

ग्रामीण पोलिस दलाने आवळल्या गुन्हेगारांच्या मुसक्या
परतवाडा येथे एकाच रात्री दरोडेखोरांनी दोन घरांत दरोडा टाकला होता. ही टोळी स्थानिक गुन्हे शाखेने बुलडाणा जिल्ह्यातून पकडली. दरोडेखोरांनी यापूर्वी बुलडाणा, औरंगाबाद अन्य ठिकाणीसुद्धा गंभीर गुन्हे केले होते. त्यामुळेच त्यांचा संपूर्ण राज्यातील गुन्हेगारीचे रेकॉर्ड एकत्र करून पोलिस अधीक्षकांनी या टोळीविरुद्ध जानेवारी २०१६ मध्ये मोक्का लावला. त्यानंतर नांदगाव खंडेश्वर येथे दरोडा टाकणाऱ्या सात दरोडेखोरांविरुद्ध फेब्रुवारी महिन्यात मोक्का लावण्यात आला होता.
बातम्या आणखी आहेत...