आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैषधी गुणधर्म असलेल्या लाेणार सराेवराला धाेका, संशाेधनाच्या मागणीसाठी नागपूर खंडपीठात याचिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - जागतिक वारसा असलेल्या लोणार सरोवराचा (जि. बुलडाणा) जलस्तर वाढत अाहे. त्याचे दुष्परिणाम या सरोवरातील पाण्याला असलेल्या औषधी गुणधर्मावर होतील. त्यामुळे लोणार सरोवराच्या जलस्तर वाढीसाठी जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेण्यात यावा आणि वाढता जलस्तर रोखण्यात यावा, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात करण्यात अाली.
लोणार सरोवराचे संवर्धन आणि विकासासाठी कीर्ती निपाणकर यांनी ही जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर बुधवारी न्या. भूषण गवई आणि न्या. इंदिरा जैन यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. या वेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी नवीन अर्ज दाखल करून ही मागणी केली. त्यांच्या अर्जानुसार, लाेणार सरोवर परिसरात भूस्खलन होत असून परिसरातून वाहणाऱ्या रस्त्यामुळे हे होत असावे. याशिवाय परिसराच्या पाचशे मीटर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असून त्यावर ती थांबवण्यात यावीत, अशी मागणी केली. याचिकाकर्त्यांच्या मागणीवर न्यायालयाने बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.

तसेच ७ ऑगस्ट २०१५ रोजी न्यायालयीन समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची दोन आठवड्यांत माहिती सादर करण्यास सांगितले.
सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे लाेणारचे सरोवर निर्माण झाले. यातील पाणी अतिशय खारट असून ते अाैषधी मानले जाते.

सांडपाण्याचाही धोका, समितीने केले उपाययाेजनांचे नियाेजन
दाेन मे रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले अाहेत. त्यानुसार सराेवर परिसरातील पिसाळ बाभूळ काढण्यासाठी वन विभागाकडे प्रस्ताव सादर असून त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प नगर परिषदेने ताब्यात घ्यावा, खंडोबा तलाव दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे, झोपडपट्टी हस्तांतरण योजनेअंतर्गत ६०६ घरकुलांपैकी ३३६ घरांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यांचा ताबा जून २०१५ पर्यंत संबंधितांना देण्यात येईल. पर्यटकांच्या सोयीसाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार शौचालये बांधण्यात येणार असून इको- फ्रेंडली स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. तसेच धार-गायमुखाच्या धारेवर कपडे, जनावरे धुण्याचे प्रमाण अधिक आहे. हे पाणी सरोवरास मिळत असून ते सरोवरासाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कपडे, जनावरे धुण्यास प्रतिबंध करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.