आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत बहरले मेळघाटचे सौंदर्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : उंचावर कोसळणारा धबधबा, पंचबोल पॉइंटवर पाच वेळा आवाज येतो ऐकू
अमरावती- सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत वसलेले चिखलदरा सध्या विविध प्रजातींच्या वनस्पतींनी नटले अन् निसर्गसौंदर्याने बहरले आहे. केवळ विदर्भाचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे नंदनवन ठरावे, अशी येथील निसर्ग वनसंपदा पाहिल्यावर प्रत्येक पर्यटकाला मनोमन वाटते.
सातपुडाच्या शिखरावर चिखलदऱ्याचे पठार असून, मोथा ते वैराटपर्यंत २५ ते ३० कि.मी. हा परिसर पसरलेला दिसतो. उन्हाळ्यातही गारवा, नजर टाकावी तेथे विहंगम दृश्य, विविध प्रजातींची फुले झाडे, हिरवा-गालिचा अन् डोंगरदऱ्यातून जाणाऱ्या ढगांची मालिका पाहून कुणालाही वारंवार यावेसे वाटते.
चिखलदऱ्याच्या सौंदर्याची किमया ही न्यारीच असून, महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पर्यटनस्थळांना लाजवेल, अशी मनसोक्त निसर्ग सौंदर्याची उधळण चिखलदऱ्यात बघायला मिळते.चिखलदरा शहराचे क्षेत्रफळ ३९४ हेक्टरच्या वर आहे. हे शहर दोन पातळ्यांमध्ये विभागले गेले आहे. समुद्रसपाटीपासून लोअर प्लॅटोची उंची हजार ६०० फूट, तर अप्पर प्लॅटोची उंची हजार ६५० फूट इतकी आहे. चिखलदरा पर्यटन नगरीत साधारणपणे १० ते १२ प्रेक्षणीय स्थळे आहेत. यांतील सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे सनसेट आहे. पण, तो केवळ उन्हाळ्यात पाहायला मिळतो.

कुठे कराल मुक्काम?
चिखलदऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा सहकारी बँक, वन विभाग यांचे स्वतंत्र विश्रामगृह आहेत. शिवाय खासगी होटेल, लॉजदेखील मोठ्या संख्येने आहेत. आमझरी येथे वन कुटीची निर्मिती केली आहे.

थंड हवेचे ठिकाण
ब्रिटिशांच्या राजवटीत उदयास आलेले चिखलदरा हे विदर्भातील एकमात्र थंड हवेचे ठिकाण आहे. हैद्राबाद फलटणीचा कॅप्टन रॉबिन्सन याने १८२३ साली चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाचा शोध लावला. इंग्रजांनीच या स्थळाचा विकास घडवून आणला. चिखलदरा म्हणजे पर्यटनस्थळ असे मानले जाते.