आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Of State For Urban Development Pvt. Ranjit Patil Visit To Amravati School

२९ पैकी हजर; २० गैरहजर, मनपा शाळेतील वास्तव उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेच्या शाळा क्रमांक चार आणि त्याला लागूनच असलेल्या शिक्षण विभागाच्या कार्यालयाला गृह तथा नगरविकास राज्यमंत्री प्रा. रणजित पाटील यांनी सोमवारी अाकस्मिक भेट दिली असता २९ पैकी नऊ हजर तर २० जण गैरहजर आढळून आले. महापालिकेच्या शाळेतील हे धक्कादायक वास्तव पाहून प्रा.पाटील यांनी गैरहजर राहणाऱ्यांचे दोन वर्षांचे गोपनीय अहवाल (सीआर) खराब करण्यासोबतच दोन वेतनवाढी (इन्क्रिमेंट) रोखण्याचा आदेश दिला आहे. या धडक कारवाईमुळे मनपा कर्मचारी शाळा शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.

सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रा.पाटील मणीबाई गुजराथी हायस्कूलमध्ये एका बैठकीसाठी गेले होते. या शाळेशेजारीच मनपाच्या शिक्षण विभागाचे कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या इमारतीतच प्राथमिक शाळा क्रमांक चार आहे. बैठक आटोपल्यानंतर साडेदहाच्या सुमारास मंत्री महोदयांनी या विभागाला भेट दिली. या ठिकाणी नियमित आस्थापनेवरील दोन शिक्षक नऊ कार्यालयीन कर्मचारी आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत १३ फिरस्ती शिक्षक पाच विषयतज्ज्ञ कार्यरत आहेत. अशा प्रकारे हजेरीपत्रकात २९ जणांची नोंद असलेल्या या शाळेत केवळ एक शिक्षक, प्रत्येकी दोन विषयतज्ज्ञ फिरस्ती शिक्षक आणि चार कार्यालयीन कर्मचारी असे केवळ नऊ जण उपस्थित होते. सकाळी ९.४५ पर्यंत सर्वांनी शाळेत पोहोचून त्यांच्या स्वाक्षरी व्हायला पाहिजेत, परंतु मंत्री महोदय शाळेत पोहोचले असतानाही पावणे अकरा वाजेपर्यंत २० जण पोहोचले नव्हते.

यांच्यावर होणार कारवाई
पाहणीदरम्यान गैरहजर असलेल्या सहायक शिक्षिका दीपाली मोरे, विषय तज्ज्ञ योगेश राणे, सुषमा दुधे दीपाली थोरात, फिरस्ती शिक्षक धीरज सावरकर, स्मिता रामटेके, सोनिया पवार, वैशाली सोळंके, कैलास कुलट, मोरेश्वर चव्हाण, उज्ज्वल जाधव, सुजाता राजनकर, गिरीश लाकडे, सुनंदा वानखडे कुमुदिनी देवळे आणि कर्मचारी संजय वडुरकर, क्षमा कुसरे, भारत वाघमोडे, दीपक मोंढे दिवाकर लकडे यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.

शिक्षणाधिकारी गेले सुटीवर
जिल्हापरिषदेतून निवृत्त झालेल्या अशोक वाकोडे यांच्याकडे सध्या मनपाच्या शिक्षणाधिकारीपदाची जबाबदारी आहे. त्यांनी आजपासून दोन दिवसांची सुटी घेतली असल्याने ते कार्यालयात हजर नव्हते. शिवाय आधीच सुटी घेतली असल्याने सोमवारी होणाऱ्या आमसभेलाही ते अनुपस्थित असतील. दरम्यान, येत्या ३१ जानेवारी रोजी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असून, त्यापुढे त्यांना मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी चर्चा आहे.