आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मिरग्या’वरही अवकळा, वरूड तालुक्यात संत्र्यांचे सौदे व्यापाऱ्यांकडून रद्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरूड - आंबियाबहाराला यावर्षी विक्रमी भाव मिळत असताना ऐन हंगामात नोटाबंदीच्या निर्णयाने आंबिया बहाराचा संत्रा मातीमोल झाल्यानंतर आता तीच परिस्थिती मृग बहाराच्या संत्र्यावर आली आहे. मागील वर्षी सुमारे तीन हजार रुपये प्रति हजार रुपयांवर गेलेल्या संत्र्याचे दर यावर्षी सरासरी हजार रुपयांपर्यंत घसरल्याने तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. 
 
तालुक्यात आंबिया मृग बहाराचे मोठ्या प्रमाणात विक्रमी उत्पादन घेतले जाते. यावर्षी आंबिया बहाराला ऐन हंगामात सरासरी तीन हजार रुपये प्रति हजारचा विक्रमी दर मिळत असताना आक्टोबर मध्ये झालेल्या नोटाबंदीचा जबर फटका बसून शेतकऱ्यांना आंबिया बहाराची संत्री सरासरी हजार रुपये प्रति हजार रुपये दराने विकावी लागली होती. आंबिया बहाराच्या हंगामात जबर नुकसान सहन केल्यानंतर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या आशा मृग बहारावर टिकून होत्या. मागील वर्षी मृग बहाराला तीन ते साडे तीन हजार रुपये प्रति हजाराचे चढे दर मिळाले होते. परंतु झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते. यावर्षी आंबियाचा हंगामात जबर नुकसान सहन केल्यानंतर भरघोस आलेल्या मृग बहाराने आशा पल्लवीत केल्या असताना सध्या मृग बहाराच्या संत्र्याचे दरही सरासरी हजार रुपयांवर आले आहेत. या हंगामातही नोटाबंदीचा गंभीर परिणाम दिसून येत असल्याने बागांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. 

पैसाच नसल्याने संत्राबागा खरेदीचे व्यवहार ठप्प झाले असून काही सौदेही रद्द झाले आहेत. तालुक्यात सुमारे २१ हजारपेक्षा अधिक हेक्टरमध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते. या व्यवहारात कोट्यवधीची उलाढाल केली जात असून तालुक्यातील जामगांव, बारगांव, खडका, बेनोडा शहीद, शेंदुरजनाघाट, टेंभुरखेडा, गव्हाणकुंड, राजुरा 

बाजार, जरूड, हातुर्णा, लोणी, पुसला, आमनेर, गोरेगांव, तिवसा, पळसोना, सातनुर, वाई, चांदस वाठोड्यासह इतर गावांच्या परिसरात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. संत्र्याच्या व्यवहारावर अद्यापही नोटाबंदीचे सावट कायम असल्याने कोट्यावधी रुपयांचा संत्रा व्यवहार ठप्प झाला आहे. यापुर्वी संत्र्याच्या व्यवहारात संत्रातोडीपूर्वी ५० टक्के आणि त्यानंतर ५० टक्के रोख रक्कम संत्रा उत्पादकांच्या हातात पडायची. नोटाबंदिनंतर काही व्यापाऱ्यांनी धनादेशाने व्यवहार करण्याचे मान्य केले. 

पण बागा विकूनही धनादेश बाऊंस झाल्याचा वाईट अनुभव आल्याने सध्या शेतकरी खरेदीदारांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. बहुतांश खरेदीदार परप्रांतीय आहेत. आठ दिवसापासून संत्रा व्यवहार बंद असून थेट शेतातून संत्रा उचलणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संत्रातोडीही थांबल्या आहेत. काही जणांचे पूर्वीचे संत्र्याच्या सौद्याचे करार भरत आल्याने संत्रा तोड जोरात सुरू होती.मात्र सध्या तोडी एकाएकी बंद झाल्या आहेत. नोटाबंदीपुर्वी व्यापाऱ्यांकडे हवालाच्या पैशातून संत्र्याचे व्यवहार होत असे. परंतु सध्या कॅशलेस व्यवहारामुळे खरेदीदारांकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसा नसल्यामुळे संत्र्याचे व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नवीन व्यवहार थांबल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात संत्री झाडावरच पडून असल्याचे भयानक चित्र आहे. 

रकमेचा होतोय त्रास 
या वर्षी संत्र्याचे उत्पादन मोठ्याप्रमाणात होते. परंतु अचानक भाजप सरकारने नोटबंदी केल्यामुळे संत्र्याचे भाव गडगडले ते अजुनही वर यायला तयार नाही. रक्कम हवी तेवढी मिळत नाही. संत्रा उत्पादक शेतकरी चेकने रक्कम घ्यायला तयार नसल्याने संत्राचे हाल होत आहे. मनोजपेलागडे, व्यापारी. 
 
सौदे झाले रद्द 
पंतप्रधानांचा नोटाबंदीचानिर्णय शेतकरी शेतमजुरांसाठी त्रासदायक ठरला आहे.एकीकडे संत्र्यांचे सौदे रद्द होत आहेत. नोटा बंदीचा फटका सर्वात जास्त संत्रा उत्पादकांना बसत आहे. आज ही परीस्थीती आहे की, संत्रा घ्यायला कोणी तयार नाही. झालेले सौदेही रद्द होत आहे. -श्रीधर सोलव शेतकरी बारगांव, 
 
संत्रा झाला बेभाव 
या वर्षी संत्र्याला चांगले भाव असताना नोटाबंदीचा जबर फटका संत्रा उत्पादकांना बसला. शासन कोणतेही असो शेवटी मरण शेतकर्‍याचेच होते. यावर्षीसंत्रा उत्पादक कर्जमुक्त होण्याचे स्वप्न पाहत होते.मात्र खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद झाल्याने संत्रा बेभाव झाला आहे. मोहनअलोणे, शेतकरी बेनोडा शहीद 
 
संत्रा उत्पादक सापडले अडचणीत 
संत्रा बागांच्या व्यवहाराला बाजार समितीच्या आवारात कुठेच संरक्षण मिळत नसल्यामुळे संत्रा उत्पादक कमालीचे अडचणीत आले आहे. परप्रांतीय खरेदीदारांकडे बाजार समितीचे कोणतेच परवाने नसल्याने संत्रा उत्पादकांना फसवणूक झाल्यानंतर कुठेच दाद मागण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...