आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-अामदार राणा समर्थक भिडले, आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे अमरावतीत पेटला वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मारहाणीत जखमी झालेला भाजप कार्यकर्ता. - Divya Marathi
मारहाणीत जखमी झालेला भाजप कार्यकर्ता.
अमरावती - बडनेराचे आमदार रवी राणा यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याबाबतीत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी गेलेले भाजप कार्यकर्ते व राणा समर्थक यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांवर चपला, विटांचा मारा केला, खुर्च्यांची फेकाफेक केली. राणा यांच्या कार्यालयाची ताेडफाेडही करण्यात अाली. या गाेंधळात भाजपचे दाेन पदाधिकारी जखमी झाले.

दोन दिवसांपूर्वी राणा यांनी पोटे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याची व्हिडिओ क्लीप गुरुवारी सोशल मीडियावर फिरली. त्यामुळे संतापलेले भाजप कार्यकर्ते शुक्रवारी दुपारी १२ वाजता राणा यांच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यांनी राणांविराेधात घाेषणाबाजी केली. राणा यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी केली. त्यावर राणा समर्थकही अाक्रमक झाले. दाेन्ही गट एकमेकांना भिडले. विटा, दगड, चपलांचा मारा सुरू झाला. राणा यांच्या कार्यालयाबाहेर ठेवलेल्या खुर्च्यांचीही फेकाफेक, ताेडफाेड करण्यात अाली. पाेलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पाेलिसांनाही जुमानत नव्हते. या हाणामारीत शेजारच्या काॅम्प्लेक्समध्ये खरेदीसाठी अालेला एक युवकही जखमी झाला.

दरम्यान, भाजप व राणा समर्थकांनी एकमेकांविराेधात पाेलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या अाहेत. भाजप कार्यकर्ते व पाेटे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी अामदार राणा यांनी सायंकाळपर्यंत पाेलिस ठाण्यात ठिय्या दिला हाेता. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून दोषींवर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती पाेलिस उपायुक्त नितीन पवार यांनी दिली.

‘त्यांनी’च हल्ला केला
राणा यांचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यालयात गेलो. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनच पहिली ‘रिअॅक्शन' आली. आम्हाला काहीच करायचे नव्हते. उलट आमचे दोन पदाधिकारी गंभीर जखमी झाले . दिनेश सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष, भाजप

मंत्री पोटेंना अटक करा
हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, पालकमंत्री पोटे यांनी राजीनामा द्यावा तसेच पोलिसांनी त्यांनाही अटक करावी. जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत आपण याच ठिकाणी ठिय्या मांडणार आहाेत. रवी राणा, अपक्ष आमदार, बडनेरा जि.अमरावती

माझे लक्ष विकासाकडे
अमरावतीच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझ्यावर आहे. जिल्ह्यात विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे विरोध करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही. प्रविण पोटे, पालकमंत्री , अमरावती.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, भाजप कार्यकर्त्‍यांनी फोडले राणांचे कार्यालय....