आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात शेतकरी आक्रमक, तूर खरेदीवरून आमदार आशिष देशमुखांचे पोस्टर जाळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरखेड- स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एफसीआयकडून महत्प्रसायावर तूर खरेदीला गुरुवारी प्रारंभ झाला. परंतु, दुसर्‍याच दिवशी एफसीआयचे नियोजन कोलमडल्याने शेतकर्‍यांनी एफसीआयच्या खरेदी धोरणाचा निषेध करीत जाळपोळ केली. प्रसंगी, स्थानिक आमदार आशिष देशमुखांच्या पोस्टरचे दहन केले. तसेच शेतकर्‍यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
 
या वेळी परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. शुक्रवारी सकाळपासूनच शेतकर्‍यांची गर्दी तूर विक्रीसाठी बाजार समितीत उसळली होती. बाजार समितीतील यार्डात दोन हजार क्विंटलवर तूर पडून होती. तत्पूर्वी, तुरीची खरेदी करणे एफसीआयला आवश्यक होते. परंतु, एफसीआयच्या अधिकार्‍यांनी महामंडळाने दहा अटींची तूर खरेदीसाठी लावलेल्या निकषाप्रमाणे खरेदीला सुरुवात केली. अनेक शेतकर्‍यांची तूर रिजेक्ट केली. अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना तूर परत घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या. तोपर्यंत तालुकाभरातून शेकडो शेतकर्‍यांचा माल बाजार समितीसमोर येऊन धडकला होता.

शेतकर्‍यांनी आमदार आशिष देशमुख यांनी तूर खरेदी प्रक्रिया सुरळीतपणे राबवू, असे आश्‍वासन गुरुवारी झालेल्या प्रारंभाप्रसंगीच्या कार्यक्रमात दिले असताना अधिकार्‍यांच्या मुजोरीने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी आमदारांचा पुतळा जाळून रोष व्यक्त केला. त्यानंतर शेकडो शेतकरी तहसीलदार जयवंत पाटील यांच्या कार्यालयाकडे रवाना झाले. त्यांनी कसेतरी शेतकर्‍यांची समजूत काढली. त्यानंतर काहीच शेतकर्‍यांच्या तुरीचे मोजमाप करण्यात आले. त्यातही शनिवार, रविवारला बाजार समितीतील एफसीआयचे केंद्र बंदची सूचना असल्याने शेतकर्‍यांचा संताप टोकाला गेला. रात्री उशिरापर्यंत बाजार समितीसमोर तणावाचे वातावरण होते. कुठलीही अनुचित घटना होऊ नये म्हणून नरखेड पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. बाजार समितीचे पदाधिकारी व नरखेडातील शेतकरी नेते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रात्रीपर्यंत प्रयत्नरत होते. शेतकर्‍यांच्या तोंडून मात्र सरकारविरुद्ध धोरणाचे सूर वारंवार या वेळी उमटत होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित घटनेचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...