आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचेे अमेरिकेतील भाषण अतिशय सुंदर होते, मोहन भागवतांनी केली स्तुती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतील भाषण त्या देशाची अनावश्यक स्तुती टाळून आपल्या देशाचा आत्मसन्मान जपणारे अतिशय सुंदर भाषण होते, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी मोदींना शाबासकी दिली. संघाच्या अखिल भारतीय वर्गाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा उल्लेख केला. ‘अमेरिकेत गेल्यावर त्या देशाचे महिमामंडन होणार नाही, याची काळजी घेताना पंतप्रधान मोदी यांनी देशाचा आत्मसन्मान जपणारे अतिशय समतोल भाषण केले’, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. रेशीमबाग येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास कोलकात्याचे ज्येष्ठ पत्रकार रंतीदेव सेनगुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आपल्या भाषणात फारसे राजकीय भाष्य न करण्याची काळजी घेत सरसंघचालक भागवत यांनी कन्हैयाकुमार प्रकरणात थेट उल्लेख न करता, आकाराने छोटे पण मोठा आवाज करणाऱ्या प्रवृत्तींना अनावश्यक मोठे न करण्याची काळजी घेण्याचा सल्ला परिवारातील मंडळींना दिला. अशा प्रवृत्तींना हाताळायचे कसे, हे स्पष्ट करणारी महाभारतातील कथाही त्यांनी ऐकवली. विविधतेने नटलेल्या या देशाला भारतीयत्वाच्या भावनेने जोडून ठेवल्याचा उल्लेख करून भागवत म्हणाले की, ‘द्रविडी विचारसरणी मांडून वेगळेपणाची बीजे पेरणाऱ्या तामिळनाडूच्या अण्णादुराई सारख्या नेत्यालाही चीनच्या आक्रमणानंतर हिमालयावरील आक्रमण म्हणजे तामिळनाडूवरील आक्रमण असल्याची भावना मांडावी लागली होती. या देशावर आक्रमण करणाऱ्या परकीयांनी कधीही स्वबळावर नव्हे, तर स्वकीयांच्या साथीनेच हा देश जिंकल्याचे इतिहास सांगतो. ते संकट पुन्हा येऊ शकते. आम्ही आपसात भांडत राहिलो, तर देशाला एकतेच्या सूत्रात बांधणारे संविधानदेखील आम्हाला वाचवू शकणार नाही. आम्ही एकोप्याने राहिलो तर जगातील कुठलीही ताकद आम्हाला भयभीत करू शकणार नाही’, असे आवाहनही भागवत यांनी या वेळी केले.
बातम्या आणखी आहेत...