नागपूर : केवळ शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्य माणूसही चातकासारखी वाट पाहत असलेला मान्सून नागपूर वगळून विदर्भातील काही जिल्ह्यांत दाखल झाला असून सोमवार १९ जूनपर्यत संपूर्ण विदर्भात दाखल होण्यास अनुकूल स्थिती असल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे.
विदर्भात साधारणत: १० ते २८ जून या कालावधीत मान्सून दाखल होतो. २०१६ मध्ये १९ जून २०१५ मध्ये १४ जूनला संपूर्ण विदर्भात दाखल झाला होता. यावर्षी पहिल्यांदाच मान्सूनही टप्प्याटप्प्याने दाखल होत आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगढमधील काही भागांसह विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यांत पूर्णपणे तर गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यांच्या दक्षिण भागात मान्सून आला असल्याचे केंद्र संचालक थाते यांनी सांगितले. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मान्सून सक्रिय झालेला असताना विदर्भात मात्र अजूनही प्रतीक्षा आहे. सकाळी उन आणि उकाडा दुपारनंतर पाऊस असे सध्याचे वातावरण आहे. सायंकाळी आल्हाददायक वातावरण राहाते. कधी कधी खूप ढग दाटून येतात. आता बरसतील असे वाटत असतानाच हुलकावणी देऊन निघून जातात.
मागील वर्षी विदर्भामध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी झाला होता. यावर्षीसुद्धा चांगल्या पावसाचे संकेत वेधशाळेकडून मिळत आहेत. विदर्भातील इतर जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्याने पेरण्यांची कामे सुरू झाली आहेत. यावर्षी तूरीला फटका बसल्याने कपाशीचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.