आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ पायरसी, वाळू तस्करांना आता तडीपारी, ‘एमपीडीए’ कायद्यात समावेशास मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यातील वाळू तस्कर, व्हिडिओ पायरसी करणारे आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (एमपीडीए १९८१) कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा कृत्यांना आळा घालण्याबाबतचा सुधारणा करणारा अध्यादेश सरकारने एक डिसेंबर २०१५ राेजीच काढला हाेता. या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधानसभेत मांडण्यात अालेले विधेयक साेमवारी अावाजी मतदानाने मंजूर करण्यात अाले. या कायद्यानुसार कारवाई करण्यात येणाऱ्या व्यक्तीला स्थानबद्ध (तडीपार) करण्याची तरतूद आहे.

महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना अाळा घालण्याबाबत (सुधारणा)अधिनियम २०१५
असे नवे विधेयक पारित करून या कायद्यात सुधारणा करण्यास सभागृहाने मंजुरी दिली.
राज्यातील वाळू तस्कर, व्हिडिओ पायरसी करणारे आणि काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींना अाता ‘एमपीडीए’ या कायद्याच्या कक्षेत असलेल्या शिक्षेच्या सर्व तरतुदी लागू होणार आहेत. सभागृहाच्या सर्वसंमतीने हे विधेयक सोमवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, शशिकांत सावंत, विजय वडेट्टीवार, अब्दुल सत्तार या सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.

काळाबाजारास लगाम
वाळू तस्कर, व्हिडिओ पायरसी करणारे आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांचा समावेश ‘एमपीडीए’मध्ये करण्यात आल्याने राज्यात अन्नधान्याचा होणारा काळाबाजार थांबण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेदरम्यान सभागृहात सांगितले. तसेच वाळूची तस्करी करणाऱ्यांवर प्रतिबंध लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...