आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीची प्रादेशिक कार्यालये बंद करण्याच्या हालचाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ताेट्यात असलेल्या एसटी महामंडळाची राज्यातील सहा प्रादेशिक िवभागीय कार्यालये बंद करून खर्च वाचवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. सन १९९७ पासूनच या कार्यालयातील कर्मचारी कपात सुरू करण्यात आली. हळूहळू कर्मचारी संख्या कमी होऊन आज या कार्यालयांमध्ये फक्त सुमारे शंभर ते दीडशे कर्मचारीच कार्यरत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

राज्यात नागपूर, अमरावती, पुणे, मुंबई, नाशिक व औरंगाबाद येथे एसटीची प्रादेशिक कार्यालये आहेत. आगार, िवभाग, प्रदेश आणि मध्यवर्ती कार्यालय अशी एसटीची रचना आहे. आगाराच्या कारभारावर विभागीय कार्यालय लक्ष ठेवून असते, तर आगार आणि िवभागीय कार्यालयाच्या कारभारावर प्रादेशिक कार्यालयाचे लक्ष असते. तर या तीनही कार्यालयांवर मध्यवर्ती कार्यालयाची निगराणी असते. परंतु, आता एसटीला प्रादेशिक कार्यालये बंद करून थेट लक्ष ठेवायचे असल्याने ही कार्यालये बंद करण्याच्या हालचाली सुरू आहे. आज घडीला राज्यात एसटीचे ३१ विभाग व २५२ आगार आहेत. अाधीच ताेट्यात असलेल्या एसटीने अाता या कार्यालयांचे खर्च कमी करण्याची माेहीम हाती घेतली असल्याची माहिती अाहे.

खटाटाेप कशासाठी?
बंद करण्यात येणाऱ्या प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना इतरत्र सामावून घेण्यात येणार आहे. एसटीची सर्व प्रादेशिक कार्यालये स्वत:च्या इमारतीमध्ये आहेत. शिवाय अधिकारी- कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. मग कार्यालये बंद करून एसटीचा फायदा तरी काय होणार आहे, असा प्रश्न यासंदर्भात उपस्थित केला जात आहे. नागपूर प्रादेशिक कार्यालयाचा विचार केला तर एकेकाळी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गजबजून असणारे हे कार्यालय आता ओस पडल्यासारखे आहे. येथे आता अधिकारी-कर्मचारी ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी मिळून १५ ते २० जण आहे. सर्वच कार्यालयांची थोड्या फार फरकाने अशीच स्थिती आहे.
बातम्या आणखी आहेत...