आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपात वाॅर्ड की प्रभाग? प्रत्यक्ष निवडणुकीला दहा महिने कालावधी शिल्लक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेच्या आगामी निवडणुका सिंगल वाॅर्ड पद्धतीने होणार की बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने, याबाबत शहरवासीयांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली असून, याबाबत महापालिकेत बराच खल होताना दिसून येत आहे. प्रमुख राजकीय पक्षांसाठी प्रभाग प्रणाली पोषक असल्याचे मानले जात आहे. असे असले तरी शासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होऊ घातली आहे. महापालिकेच्या प्रत्यक्ष निवडणुकीला दहा महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. असे असले तरी प्रमुख राजकीय पक्षांसह अनेक इच्छुकांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र, एकसदस्यीय म्हणजे वाॅर्ड की बहुसदस्यीय म्हणजेच प्रभाग प्रणालीने निवडणूक होईल, याबाबत संभ्रम कायम अाहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह अनेक इच्छुक आपले पत्ते आताच उघड करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. एखादा राजकीय एजेंडा घेऊन नव्हे तर स्थानिक समस्या प्रश्नांना घेऊन महापालिकेची निवडणूक रंगत असल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे. एकाच प्रभागात निवडून गेलेले दोन राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीमुळे कशी अवस्था होते, याचा चांगलाच प्रत्यय नागरिकांनादेखील येत आहे. नाली, साफसफाई रस्ते आदी विषयांवर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक केंद्रित होत असल्याने विविध राजकीय विषयांना या निवडणुकीत थारा मिळताना दिसत नाही. शिवाय एखाद्या भागात प्राबल्य असलेल्या छोट्या किंवा प्रादेशिक पक्षाचे प्रतिनिधीदेखील निवडून येताना दिसून येते. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या वेळी प्रत्येक सदस्य हा राजकीय पक्षाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतो. त्यामुळे अन्यपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे प्रमुख राजकीय पक्षांचे प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येते. अमरावती मनपा क्षेत्रात उखडलेले तसेच खड्डेमय रस्ते, कोट्यवधी रुपये खर्च होत असताना अपेक्षेप्रमाणे होत नसलेली साफसफाई याच मुद्द्यांवर येणारी निवडणूक रंगेल की राजकीय प्रश्नांवर, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

प्रभागपद्धती राजकीय पक्षांसाठी पोषक
प्रभागप्रणाली सर्वच राजकीय पक्षांसाठी पोषक असल्याच्या प्रतिक्रिया नेत्यांकडून उमटत आहे. शिवाय कोणत्याही पद्धतीने निवडणुका घेतल्या तरी सज्ज असल्याची भूमिका सर्वच पक्षांचे नेत्यांकडून स्पष्ट होत आहे. प्रमुख राजकीय पक्षांसाठी पाेषक असली तरी अन्य छोट्या पक्षांना यात थारा मिळताना दिसून येत नाही. याबाबत राज्य शासन कोणता निर्णय घेते,याकडे लक्ष लागले आहे.

महापालिका निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी आरंभ होण्यास बराच कालावधी अाहे. असे असले तरी राजकीय पक्षांकडून त्याबाबत तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र, वाॅर्ड राहणार की प्रभाग, याबाबत स्पष्टता नसल्याने शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे.

निवडणुकीसाठी सज्ज
^प्रभाग असोकी वाॅर्ड आमचा पक्ष सज्ज आहे. बहुसदस्यीय प्रणाली राजकीय पक्षांसाठी महत्त्वपूर्ण ठरते. मात्र, अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे.त्यानंतर रणनीती ठरवली जाईल. चेतन पवार, गटनेते,राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट .

प्रभागात सर्वांना मिळते संधी
^प्रभाग पद्धती सर्वांना संधी देणारी आहे. शिवाय महिला आरक्षणदेखील आहे. प्रभाग पद्धतीत एक जागा खुली तर एक आरक्षित राहते. त्यामुळे सर्वांना निवडणूक लढवण्याची समान संधी मिळते. संजय अग्रवाल, गटनेते,भाजप

पक्षांसाठी प्रभाग पोषक
^सर्वचराजकीयपक्षांसाठी प्रभाग पद्धती पोषक ठरणारी आहे. प्रभागामध्ये राजकीय पक्षांना महत्त्व प्राप्त होते, तर अपक्षांना थारा मिळत नाही. निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज आहे. बबलू शेखावत, पक्षनेते,काँग्रेस.

नागरिकांचे हित महत्त्वाचे
^बहुसदस्यीय पद्धतीने एकापेक्षा जास्त सदस्य राहतात. जास्त सदस्य असल्याने विकासकामे रखडत असल्याचे अनुभव आहे. दोन नगरसेवकांमध्ये वाद असल्यास त्याचा फटका नागरिकांना बसतो. वाॅर्ड प्रणाली योग्य वाटते. प्रवीण हरमकर, विरोधीपक्षनेते