आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांच्या पालकत्वातून होणार मनपा शाळांचा कायापालट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आमदारांच्या पालकत्वातून महापालिका शाळांचा विकास केला जाणार आहे. आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी रुक्मिणीनगरातील मनपा शाळा क्रमांक १९, तर अामदार रवी राणा यांनी अंबिकानगरातील मनपा शाळा क्रमांक १६ दत्तक घेतली आहे. शिक्षण विभागाकडून ठेवण्यात आलेल्या विषयास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.
शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे उत्तम वातावरणात शिक्षण देण्याच्या हेतूने अामदारांनी या शाळा दत्तक घेतल्या आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत स्थानीय स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलांना उच्चतम दर्जाचे शिक्षण मिळावे, हा त्यामागील उद्देश आहे. आमदार निधीतून या शाळांचा विकास केल्या जाणार आहे. शाळांची रंगरंगोटी, सुरक्षा भिंती, भित्तीचित्रे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, योग्य प्रसाधन गृहे, संगणक सेंटर, डिजिटल प्रशिक्षण केंद्र आदी विविध सुविधा आमदार निधीतून निर्माण केल्या जाणार आहेत. शिवाय शाळांमधील शिक्षकांची संख्या, शाळेत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लाेकप्रतिनिधी लक्ष देणार आहे. लोकप्रतिनिधींकडून पालकत्व घेण्यात आल्याने महापालिकांच्या शाळांची स्थिती सुधारण्यास नक्कीच मदत मिळेल, यात शंका नाही.
महापालिका द्वारा संचालित शाळा आमदारांना दत्तक देण्याबाबत शिक्षणाधिकारी विजय गुल्हाणे यांच्याकडून आलेल्या प्रस्तावास आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मार्चला मंजुरी दिली आहे. प्रशासनाच्या वतीने हा विषय शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला. सदस्यांच्या चर्चेनंतर या विषयावर सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले.

नगरसेवक घेणार शाळा
आमदारांसोबत महापौर रिना नंदा तसेच आयुक्त चंद्रकांत गुडेवारदेखील महापालिकेची शाळा विकास करण्याकरिता दत्तक घेणार आहेत. शिवाय प्रत्येक नगरसेवकांनादेखील शाळा दत्तक घेण्याकरिता सर्वसाधारण सभेत आवाहन करण्यात आले.

^महापालिकेची रुक्मिणीनगरातील१९ क्रमांकाची शाळा दत्तक घेतली आहे. यामध्ये विविध स्वरूपात सुधारणा केली जाईल. एका शाळेचा विकास करण्यात आल्यानंतर अन्य शाळादेखील दत्तक घेत विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणार आहे. डॉ. सुनील देशमुख, आमदार.
बातम्या आणखी आहेत...