आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा,जि.प. निवडणूक एकत्र घेण्याचा प्रस्ताव, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली पत्रपरिषदेत माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत वेळ वाचावा तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी या दोन्ही निवडणुका एकाच दिवशी घेण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पत्रपरिषदेत दिली. मनपा जि.प. निवडणूक फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असे संकेत निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे येत्या ११ किंवा १२ तारखेपासून निवडणूक आचार संहिता लागू शकते, असेही त्यांनी सांगितले. 

दोन्ही निवडणुकीत आॅनलाईन नामांकन अर्ज सादर करावे लागतील. नगर पालिका निवडणुकीत ८० टक्के अर्ज आॅनलाईन भरले गेले. आॅनलाईन अर्ज भरण्यात उमेदवारांना कोणतीही अडचण भासू नये म्हणून प्रत्येक राजकीय पक्षातील दोन व्यक्तींना आॅनलाईन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. उमेदवार प्रतिज्ञापत्रात जी माहिती भरतात ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी असे उद्देश असतो. त्यामुळे प्रतिज्ञा पत्रातील माहिती वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाणार असून पोलीस ठाण्यांबाहेरही लावली जाणार अाहे. नवीन प्रयोग म्हणून त्याच प्रतिज्ञापत्रात उमेदवाराच्या विकास योजना आणि व्हीजनही मागवले जाणार आहे. मात्र हे अनिवार्य नाही. निवडणूक तांत्रिक ठेवता मुद्यांवर चर्चा व्हावी हाच यामागील हेतू आहे. ट्रू व्होटर अॅपचा उपयोग व्हावा म्हणून प्रत्येक उमेदवाराला त्यावर दैनंदिन खर्चाचा तपशील सादर करता येईल. तसेच निवडणूक अर्ज भरणाऱ्या उमेदवाराला एका महिन्याच्या आत तर राजकीय पक्षाला दोन महिन्यांच्या आत खर्चाचा तपशील सादर करणे अनिवार्य असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 

जि.प., मनपा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यामुळे अनेकांमध्ये आचार संहितेबाबत संभ्रम आहे. त्यामुळेच पदवीधर निवडणुकीची आचार संहिता लागू झाल्याने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी गाड्या परत कराव्यात असे पत्र पाठवण्यात आले अाहे. सोबतच उद्घाटन, बैठका घेता येणार नाही, असेही कळवण्यात आले आहे. प्रत्येक मतदाराला घरपोच व्होटर स्लीप देणार आहे. त्यामुळे त्यांना मतदानाच्या  दिवशी नाव शोधण्यास अडचण जाणार नाही. प्रत्येक तालुक्यासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर तहसीलदार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघतील, असेही त्यांनी सांगितले. 

गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष पथक : साहित्य,पैसे मद्याचे वाटप होऊ नये म्हणून जिल्हा शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत विशेष पथक नियुक्त केले जाणार आहे. जिल्ह्यात दरमहा १३ लाख लीट मद्याची विक्री होते. निवडणुकीच्या काळातही यापेक्षा जास्त मद्याचा पुरवठा होणार नाही, याकडे जिल्हा प्रशासनाचा कटाक्ष असणार आहे. निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी सर्व उपाय केले जातील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 

आधार कार्डवरील पत्त्यानुसार गाव निश्चित : बरेच मतदार हे मनपा आणि जिल्हा परिषद अशा दोन्ही निवडणुकींमध्ये मतदान करतात. त्यामुळे यावेळी आधार कार्डवरील पत्त्यानुसारच मतदाराला मतदान करता येणार आहे. ज्या मतदारांची नावे तीन ठिकाणी होती त्यांची दोन नावे वगळून एकच नाव कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पदवीधर निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीतून ३७०० नावे कमी झाली आहेत.