आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा निवडणुकीत वाढली आयाराम-गयारामांची संख्या, तिकीट न मिळाल्‍यास झटपट होतोय पक्षबदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिका निवडणुकीत शहरात मोठी राजकीय उलथा-पालथ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उमेदवारी देताना डावलण्यात आल्याने अनेकांनी पक्षाची साथ सोडत अन्य पर्याय शोधल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत आयाराम-गयारामांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ११ विद्यमान नगरसेवकांनी सोडचिठ्ठी देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. काँग्रेसच्या चार विद्यमान नगरसेवकांनी देखील अन्य पक्षाचा रस्ता धरल्याचे दिसून येत आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या ८१८ उमेदवारांच्या नामांकन अर्जांची फेब्रुवारीला झोन कार्यालयात छाननी करण्यात आली. यातील नामांकन अर्ज दाखल करण्यात आलेल्या वैध उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली. फेब्रुवारीपर्यंत नामांकन मागे घेता येणार असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. असे असले तरी नामांकन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच राजकीय समीकरण अस्थिर झाल्याचे दिसून येत होते. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या नगरसेवकांमध्ये मावळत्या महापौर चरणजित कौर नंदा, मावळते स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, गटनेता चेतन पवार, सारीका प्रमोद महल्ले, निलीमा काळे, ममता आवारे, मिलिंद बांबल, वंदना हरणे, सुनील काळे, सपना ठाकुर, जयश्री मोरय्या यांचा समावेश आहे. संजय खोडके यांच्या राजीनाम्यामुळे शहरात वाताहत झाल्याने अन्य काही नगरसेवकांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. शिवाय लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर झाल्याने भारतीय जनता पक्षाकडून अनेकांच्या आशा बळावल्या. 
 
मात्र प्राबल्य नसलेल्या भागात भाजपने आयारामांची गंगा पार नेली. संजय खोडके यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे त्यांचे समर्थक काही नगरसेवकांनी काँग्रेसने उमेदवारी दिली. मात्र काही नगरसेवकांची तिकीट देखील काँग्रेसकडून कापण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने सभापती राहिलेल्या नेत्यांचा समावेश असून त्यांना आता अपक्ष म्हणून लढण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या तिजोरीची चाबी असलेल्या स्थायीचे सभापती पद भूषविलेले चेतन पवार यांनी बहुजन समाज पक्षात एंट्री केली. अंतर्गत कलहामुळे साईनगर प्रभागातील भाजपच्या नगरसेविका मंजुषा जाधव या शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका वनिता तायडे, अनेक वर्ष काँग्रेसच्या चिन्हावर निवडून येणाऱ्या डाॅ. कांचन ग्रेसपुंजे यांनी ‘गॉडफादर’ नसल्याने युवा स्वाभिमानची वाट धरली आहे. राजकारणात तत्व तसेच निष्ठेच्या बाता करणाऱ्यांनी निवडणुकीच्या रणांगणात ‘तत्व निष्ठा’ बासणात गुंडाळून ठेवली असल्याचे दिसून येत आहे. 
 
महापौर झाल्या काँग्रेसवासी 
महापालिकेच्या मावळत्या महापौर चरणजित कौर नंदा मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय बदलानंतर महापौर चरणजित कौर नंदा यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. चरणजित कौर नंदा ह्या काँग्रेसच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात आहे.