आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या युवकाचा खून; मृतदेह टाकला तलावामध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका २० वर्षीय युवकाचा मृतदेह गुरूवारी २२ सप्टेंबरला सायंकाळी छत्री तलावात आढळला होता. या प्रकरणात राजापेठ पोलिसांना गुरूवारी उशिरा रात्रीच मृतकाची ओळख पटली होती. शुक्रवारी २३ सप्टेंबरला सकाळीच राजापेठ पोलिसांनी प्रकरणातील मुख्य असलेल्या एकाला ताब्यात घेतले होते. दरम्यान शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलिसांचा तपास सुरूच होता. पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी आणखी चौघांना असे एकूण पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
चांद महेबूब चौधरी (२०, रा. पंचशील नगर) असे मृतकाचे नाव आहे. गुरूवारी सायंकाळी काही नागरिकांना शहरालगत असलेल्या छत्री तलावात एक मृतदेह आढळला होता. मात्र सुरूवातीला काही वेळ या मृतकाचीओळख पटली नव्हती. दरम्यान गुरूवारी रात्रीच चांदचा भाऊ सुभान हा फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात चांद बेपत्ता असल्याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी गेला. त्याचवेळी राजापेठ पोलिसांनी त्याला छत्री तलावातून बाहेर काढलेला मृतदेह दाखवला. हा मृतदेह चांदचा असल्याचे त्याने ओळखले. या मृतदेहाची शुक्रवारी सकाळी पोलिसांनी पुन्हा पाहणी केली, त्यावेळी त्याच्या डोक्यावर वार दिसला, रक्तस्त्राव झाल्याचेही जाणवत होते. त्यामुळे चांद याचा खून असल्याचा निष्कर्ष पाेेलिसांनी काढला होता. दरम्यान शवविच्छेदन अहवालाचा प्राथमिक अहवालसुद्धा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचा आला. त्या आधारे पाेेलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. दरम्यान चांद चौधरींविरुद्ध शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात मारहाणीचे तीन गुन्हे तसेच दोन प्रतिबंधक कारवाई आणि वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे गंभीर मारहाण प्रकरणीसुद्धा गुन्हा दाखल असल्याचे राजापेठ पोलिसांना कळले होते. तसेच यवतमाळ जिल्ह्यातही एका ठिकाणी गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध सुरू केला तर पंचशीलनगर भागात राहणाराच योगेश दिलीप हुमने आणि चांद हे दोघे बुधवारी सोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिसांनी योगेशचा शोध घेतला मात्र तो घरी नव्हता. तो यवतमाळात असल्याची माहिती मिळताच राजापेठ डिबी पथकाने त्याला यवतमाळातून नातेवाईकांकडून ताब्यात घेतले. चांद हा गुन्हेगारी वृत्तीचा असून, यापूर्वी त्याने दोन ते तीनवेळा वाद घातला, चाकू मारण्याचा प्रयत्न केला, मंगळवारी २० सप्टेंबरला रात्रीसुद्धा त्याने मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचा वचपा काढण्यासाठी बुधवारी त्याला मारहाण करून मृतदेह छत्री तलावात टाकल्याचे योगेशने राजापेठ पोलिसांना सांगितले होते. मात्र या प्रकरणात योगेशसोबत आणखी सहकारी असल्याचा अंदाज पोलिसांना होता,अशी माहिती राजापेठ पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई राजापेठचे ठाणेदार शिशिर मानकर, पीएसआय शंकर डेडवाल, पंकज ढोके, राहुल चव्हाण, हेड कॉन्स्टेबल रंगराव जाधव, सतीश देशमुख, दिनेश भिसे, दिनेश नांदे, राजु गुरीले यांनी केली आहे. दरम्यान गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळीच आणखी चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी शुक्रवारी रात्रीपर्यंत सुरूच होती.

चांदच्यातडीपारीचा पाठवला होता प्रस्ताव : मृतकचांद चौधरींविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसातच तीन मारहाणीचे गुन्हे दाखल आहे. तसेच त्याच्याविरुद्ध दोनवेळा प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. त्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच त्याला शहरातून तडीपार करण्यासंदर्भात प्रस्ताव वरीष्ठांकडे पाठवण्यात आला होता. मात्र काही त्रुटीअभावी त्या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळाली नव्हती, असे फ्रेजरपुराचे ठाणेदार प्रमेष आत्राम यांनी सांगितले आहे.
छत्री तलावातून गुरुवारी सायंकाळी युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या वेळी उपस्थित पोलिस अधिकारी कर्मचारी.
बातम्या आणखी आहेत...